रुंजी या मालिकमुळे पल्लवी पाटील नावारूपाला आली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पल्लवी या मालिकेत काम करण्यासोबतच धनगरवाडा या चित्रपटातदेखील काम केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका ही रुंजीपेक्षा पूर्णपणेच वेगळी होती. पल्लवी एकाच साच्यातील भूमिका न करता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे पसंत करते. तिच्या बापमाणूस या मालिकेची तर चांगलीच चर्चा झाली होती. ही मालिका आणि या मालिकेतील पल्लवीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका संपून काहीच दिवस झाले आहेत. या मालिकेनंतर प्रेक्षकांची लाडकी पल्लवी त्यांना कोणत्या भूमिकेत दिसणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. पण आता पल्लवीच्या फॅन्ससाठी एक खूप छान बातमी आहे. पल्लवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना भेटणार आहे.
पल्लवी कोणत्या मालिकेत नव्हे तर एका नाटकात झळकणार आहे. तिच्या नवीन नाटकाचे नाव WHY So गंभीर असे असून नाटकात तिच्यासोबत आरोह वेलणकर मुख्य भूमिकेत आहे. गांभीर्यानं घ्यावं असं विनोदी नाटक अशी या नाटकाची टॅगलाइन असून या नाटकाचा शुभारंभ 23 डिसेंबरला यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. त्यानंतर दादर, शिवाजी मंदिर येथे आणि पनवेल येथील क्रां. फडके येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
WHY So गंभीर या नाटकाची निर्मिती अथर्व थिएटर्सची असून निर्माते संतोष भरत काणेकर आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अमोल भोर आणि गिरीश दातार यांनी केले आहे तर नाटकाचे लेखक गिरीश दातार हेच आहेत.
WHY So गंभीर या नाटकाचे पोस्टर नुकतेच अथर्व थिएटरने त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पल्लवीचा लूक खूपच वेगळा दिसत आहे. तसेच पल्लवी आणि आरोहच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल पाहायला मिळत आहे. पल्लवीच्या या नाटकाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत यात काहीच शंका नाही.