Join us

वास्तववादी घटनेवर आधारीत चित्रपट 'प्रतिज्ञा', पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 8:24 PM

प्रतिज्ञा हा सिनेमा एका वास्तववादी घटनेवर आधारित आहे.

मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत.त्यात अलीकडचे चित्रपट भरघोस यश मिळवून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.त्यामुळे देशाच्या वास्तव घडामोडींवर व नियमांवर भाष्य करणाऱ्या "प्रतिज्ञा- तुम्ही बदला,देश बदलेल" या आगळ्यावेगळ्या सिनेमाच्या स्क्रिप्टचे पूजन व पोस्टरचे प्रकाशन नुकतेच गणेश गल्ली लालबाग गणेश उत्सव मंडळात अनेक कलावंत व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच या सिनेमाचे सहाय्यक निर्माते व अभिनेते अजित वसंत पवार,लेखक आशिष निनगुरकर,कलावंत प्रदीप कडू,सुनील जाधव,सिद्धेश दळवी,प्रॉडक्शन मॅनेजर प्रतिश सोनवणे व स्वप्नील निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

"प्रतिज्ञा हा सिनेमा एका वास्तववादी घटनेवर आधारित असून, मनोरंजनाबरोबर लोकांच्या डोळ्यांत अंजन घालेल आणि आजच्या वास्तवतेतून समाजप्रबोधन होण्यास मदत होईल" असे सूतोवाच या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर यांनी यावेळी केले.

"भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल तर सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे.मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत पोचवता येतो" हा एक स्तुत्य प्रयत्न असल्याचे मत नाट्यकलावंत प्रदीप कडू यांनी व्यक्त केले.

काव्या ड्रीम मुव्हीज यांच्या सहयोगाने 'प्रतिज्ञा' या  चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.  यावेळी "प्रतिज्ञा" या मराठी चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन व पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि सर्व कलाकारांचा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.