Join us

समीर पाटील यांचा नवा चित्रपट 'भाऊबळी', या लेखकाच्या कथेवर आधारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:07 IST

नववर्षात दिग्दर्शक समीर पाटील प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नवा चित्रपट

टेलिव्हिजन क्षेत्रात दर्जेदार मालिका आणि मोठ्या पडद्यावर घंटा,  मुरांबा, अशा यशस्वी चित्रपटाची निर्मिती करणारी ‘दशमी' टीम, 'भाऊबळी' या नव्याकोऱ्या सिनेमाद्वारे नवीन वर्षाची धमाकेदार सुरूवात करीत आहे. 

जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पुरस्कार विजेत्या कथासंग्रहातील ‘६७२ रूपयांचा सवाल, अर्थात युद्ध आमुचे सुरू...!’ या कथेवर आधारित समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला.

मेरे साई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - महा मानवाची गौरवगाथा या मालिकांची यशस्वी निर्मिती करत  महान व्यक्तिमत्वांचे चरित्रपट छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘दशमी’ची नितिन वैद्य,निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगांवकर हे त्रिकुट करत आले आहे. 

 नववर्षाची सुरूवात करताना 'भाऊ बळी' या चित्रपटाबरोबरच महाराष्ट्राबरोबरच देशाला स्त्री शिक्षण आणि समानतेच्या वाटेवर घेऊन जाणा-या फुले दाम्पत्याची चरित्रगाथा 'सावित्रीजोती' ह्या मालिकेद्वारे ते लोकांसमोर घेऊन येत आहेत. मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना आशयघन कलाकृतींची मेजवानी देखील २०२० च्या निमित्ताने चाखायला मिळणार आहे.