Join us  

खऱ्या आयुष्यातील ‘तो’ एक किस्सा आणि दिग्दर्शकाने बांधला ‘बस्ता’, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 8:57 PM

लग्नाच्या बस्त्याभोवती घडणारी वडील-मुलीच्या नात्याची गोष्ट बस्ता या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स प्रस्तुत, सुनिल राजाराम फडतरे निर्मित आणि तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. लग्नाच्या बस्त्याभोवती घडणारी वडील-मुलीच्या नात्याची गोष्ट नेमकी कशा पध्दतीने दाखवण्यात आली असावी याचा अंदाज प्रेक्षकांना ट्रेलरमधून आला असावा.‘बस्ता’ चित्रपट नुकताच झीप्लेक्सवर रिलीज करण्यात आला आहे.

‘बस्ता’ गेल्या वर्षी १७ एप्रिलला प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे संपूर्ण जग थांबंलं आणि सिनेमा प्रदर्शित होता होता राहिला, अशा प्रसंगी दिग्दर्शकाला काय वाटलं असेल, याविषयी व्यक्त होताना दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, “मला खरं तर खूप टेन्शन आलेलं की आता आपला सिनेमा कधी आणि कसा प्रदर्शित होणार. जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसं तसं टेन्शन आणखी वाढू लागलं. त्या दरम्यान निर्माते सुनिलजींकडे चर्चा केली आणि हा सिनेमा ‘झी’कडे गेला त्यानंतर मी थोडा निश्चिंत झालो आणि मला खात्री वाटली की हा सिनेमा ‘झी’कडे गेला म्हणजे सिनेमा प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहचणार.”

दिग्दर्शकाच्या खऱ्या आयुष्यातील एका प्रसंगामुळे सुचली ‘बस्ता’ची संकल्पना, दिग्दर्शक तानाजी यांनी सांगितले की, “सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलंय की स्वातीच्या (सायली संजीव)च्या वडीलांचा (सुहास पळशीकर) टेम्पो हा काही कारणास्तव पोलिसांच्या ताब्यात असतो आणि त्याच दरम्यान स्वातीच्या लग्नाचा बस्ता टेम्पोमधून चोरीला जातो. तर खरा प्रसंग असा घडला होता, पंढरपूरच्या पोलिस स्टेशनवर मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. एक इसम सतत पोलिसांना विनंती करत होतो की माझा टेम्पो सोडा, माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे. पोलिस त्याच्या विनंतीला काही दाद देत नव्हते. त्याच्या टेम्पोने एका माणासाला धडक दिली होती आणि तो जखमी झालेला, ती घटना घडल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला आणि ड्युटीवर असणाऱ्या हवालदाराने तो टेम्पो पोलिस स्टेशनवर आणला. ड्रायव्हरला हजर करा किंवा विशिष्ट रक्कम भरा मग टेम्पो देतो असं पोलिस त्याला सांगत होते. त्या इसमाने खूप कर्ज काढून लग्नाचा घाट घातला होतो, तो देखील शेतकरी होता. हा प्रसंग मला भावला, मी मुंबईला आल्यावर लेखक अरविंद जगताप यांना हा किस्सा सांगितला आणि त्या प्रसंगावर संपूर्ण सिनेमा त्यांनी लिहिला.”

अभिनेत्री सायली संजीवने यामध्ये ‘स्वाती’ची भूमिका साकारली आहे. सेटवर सर्व मोठी कलाकार मंडळी असल्यामुळे, त्यांच्यासोबत काम करायाला मिळाल्यामुळे सायली स्वत:ला लकी मानते. सायलीच्या मते, “कलाकाराला जशी भूमिका हवी असते तशी स्वातीची भूमिका आहे. खूप छान काम करायला मिळाले. सिनेमाची गाणी प्रचंड सुंदर बनली आहेत.” 

टॅग्स :सायली संजीव