Join us

प्रियदर्शन म्हणतोय, केवळ या व्यक्तिमुळेच मी नागपुरी भाषा शिकलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:42 IST

प्रियदर्शन जाधव याने मी पण सचिन सिनेमात महत्वाची भूमिका बाजवली आहे. प्रियदर्शन हा या सिनेमात विकी आमले नावाची भूमिका साकारतो आहे.

ठळक मुद्देविकी सचिनच्या चांगल्या, वाईट गोष्टींमध्ये नेहमी सोबत असतो

'मी पण सचिन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी 'सचिन पाटील' या मध्यवर्ती तरुणाची भूमिका साकारत आहे. स्वप्नील सोबत अभिजीत खांडकेकर, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते असे अनेक कलाकार या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे. यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव हा देखील एक महत्वाची भूमिका बाजवताना दिसतोय. प्रियदर्शन हा या सिनेमात विकी आमले नावाची भूमिका साकारतो आहे. विकी हा सचिनचा म्हणजे स्वप्नील जोशीचा जिवाभावाचा मित्र असतो. विकी सचिनच्या चांगल्या, वाईट गोष्टींमध्ये नेहमी सोबत असतो. त्याला प्रत्येकवेळी पाहिजे ती मदत करण्यास तो कधीही मागे पुढे पाहत नाही. असा का विकी आमले साकारताना प्रियदर्शनला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. त्याच्या या अनुभवाबद्दल प्रियदर्शन सांगतो. "हा चित्रपट मला ऑफर झाल्यानंतर मला अनेक गोष्टी शिकायच्या होत्या. त्यात महत्वाची एक गोष्ट शिकणे आवश्यक होते ते म्हणजे नागपूरची मराठी भाषा. कारण हा चित्रपट नागपूर आणि त्याच्या आजूबाजूला घडतो. त्यामुळे तिकडची भाषा शिकणे माझ्यासाठी एक आव्हानच होते. परंतु श्रेयश जाधव हा मूळचा नागपूरचा असल्याने त्याने मला तिकडची भाषा शिकण्यासाठी खूप मदत केली. कोणतीही भाषा शिकणे त्या भाषेचा एक लहेजा बोलण्यात आणणे सोपे नाहीये, कारण मी भाषा शिकण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळाने पुन्हा आपल्या रोजच्या मराठी भाषेत बोलायला लागायचो. बोलताना माझी भाषा कधी बदलायची हे माझेच मला समजायचे नाही. आणि मग त्यातून सेटवर माझी खिल्ली उडवायचे. खूप मजा यायची मला. पण शेवटी मी ती भाषा बोलण्यास शिकलो अगदी तरबेज झालो असे नाही, पण चित्रपटात माझ्या भूमिकेला योग्य न्याय मिळेल एवढी भाषा मी नक्कीच आत्मसात केली. आणि याचे श्रेय मी श्रेयशला देतो." खरंच अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयी पर्यंत कलाकारांना एखादी भूमिका वठवतांना स्वतः मध्ये किती बदल करावे लागतात हे या छोट्या छोट्या गोष्टीवरून लक्षात येते.

 इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन श्रेयश जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :प्रियदर्शन जाधवश्रेयश जाधव