सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या कोणत्याही नेटकऱ्यासाठी भाडिपा हे नाव नवीन राहिलेलं नाही. स्टॅण्डअप कॉमेडी, कास्टिंग काऊच, वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ असं बरंच काही या मराठमोठ्या युट्यूब चॅनेलने प्रेक्षकाच्या भेटीला आणलं. त्यामुळे सध्याच्या काळात तरुणांमध्ये भाडिपाची जबरदस्त क्रेझ आहे. विशेष म्हणजे सेलिब्रिटींपासून सुरु झालेल्या या प्रवासात भाडिपाने सामान्य व्यक्तींनादेखील काम करण्याची संधी दिली आहे. अलिकडेच भाडिपाने कोथरुड वर्सेस कोल्हापूर हा नवा सेगमेंट सुरु केला आहे. या सेगमेंटमधील सुमित पाटील हा नवा चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर मीम्स शेअर करुन प्रकाशझोतात आलेला सुमित पाटील हा तरुण आज भाडिपाचा एक भाग झाला असून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळेच सुमितने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली असून त्याची भाडिपामध्ये एण्ट्री कशी झाली हे सांगितलं आहे.
"खरंतर मार्च महिन्यापासून माझा भाडिपासोबतचा प्रवास सुरु झाला. सध्या भाडिपावर मी ज्या पद्धतीचे व्हिडीओ मीम्स करतोय तो प्रकार आताच्या काळात फारसा कुठे पाहायला मिळत नाहीये. कारण, यात मी दुसऱ्या एखाद्या चित्रपटाच्या सीनमध्ये जाऊन डबिंग करतोय. हा नवा प्रकार मी जानेवारीमध्येच सुरु केला होता. त्यावेळी मी हे मीम्स फक्त माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करत होतो. यातलेच काही व्हिडीओ भाडिपाच्या टीमने पाहिले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आणि, त्यानंतर मग माझा भाडिपासोबतचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.
पुढे तो म्हणतो, " भाडिपाच्या प्रत्येक कलाकारासोबत काम करताना फार मज्जा येतीये. आधी मी फक्त मीम्स करायचो पण आता अभिनयदेखील करु लागलो आहे. ही संधी भाडिपामुळेच मिळाली. माझ्या बोलण्यात कोल्हापुरी लहेजा असल्यामुळे मला कोथरुड वर्सेस कोल्हापूर या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, सुमित पाटील हा मूळचा कोल्हापूरचा असून सध्या भाडिपाच्या कोथरुड वर्सेस कोल्हापूर या सेगमेंटमध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानादेखील सुमित प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरत आहे.