Join us

'भाई : व्यक्ती की वल्ली'च्या दुसऱ्या भागात 'या' गोष्टीसाठी घ्यावी लागली इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 7:00 PM

येत्या 8 फेब्रुवारीला 'भाई : व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे.

ठळक मुद्दे तरूणपणीचा विग 8 दिवसांमध्ये झाला तर म्हातरपणीचा विग व्हायला वीस दिवस लागले

येत्या 8 फेब्रुवारीला 'भाई : व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. भाईंचा हा लूक हुबेहुब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे. सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातरपणापर्यंतचे विग्स ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ने बनवलेले आहेत.

‘नॅचरल हेअर स्टुडियो’चे जितेंद्र साळवी ह्या लूकविषयी सांगतात, “भाईंच्या तरूणपणीच्या विगपेक्षा त्यांच्या म्हातरपणाचा विग जास्त कठीण होता. तरूणपणीचा विग 8 दिवसांमध्ये झाला तर म्हातरपणीचा विग व्हायला वीस दिवस लागले.  सर्वसाधारणपणे म्हातरपणी केस विरळ होत जातात. आणि केसांची मुळंही दिसू लागतात. त्यात भाईंचे म्हातरपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत. तर लक्षात येईल की, त्यांचे केस कुरळेही असणे आवश्यक होते.”  

जितेंद्र साळवी पुढे सांगतात, “भाईंची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचे कपाळ मोठे करण्यासाठी त्याचे पुढचे केसही आम्हांला भादरावे लागले. त्यांच्या म्हातरपणीचा लूक डिझाइन करण्यासाठी आम्हांला तिरूपतीवरून केस मागवायला लागले. मग एक-एक केसांचा विग बनवला.” बॉलिवूडमध्ये गेली 38 वर्ष काम करणा-या सुरेंद्र साळवी आणि 16 वर्ष काम करणा-या जीतेंद्र साळवी ह्यांचा ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ बॉलीवूडच्या जवळ-जवळ 95 टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन करतो. जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या भाई, उरी, ठाकरे ह्या मोठ्या सिनेमांसाठी त्यांनी विग डिझाइन केले आहेत. भाई सिनेमासारखेच ठाकरे सिनेमासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीचा लूक डिझाइन करणे खूप चॅलेंजिंग असल्याचे जितेंद्र साळवी सांगतात, “नवाजुद्दीनचे कपाळ ‘व्ही’ आकाराचे आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचे कपाळ सरळ आणि मोठे होते. त्यामुळे ‘ठाकरें’चा लूक देताना बॉल्ड कॅप, हेअर पॅसेचा वापर करून नवाजुद्दीन ह्यांना लूक द्यावा लागला.”

टॅग्स :भाई-व्यक्ती की वल्ली