मराठी अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. मोठ्या पिढीपासून ते आताच्या पिढीपर्यंत सर्वच त्यांचे चाहते आहेत. त्यांचं 'सही रे सही' हे नाटक तर कोणाला माहित नसेल असं होणारच नाही. मराठी नाटकावर प्रचंड प्रेम करणारे भरत जाधव काही कलाकरांवर मात्र संतापले आहेत. नाटक करुन बघायचं म्हणून करायचं आणि नंतर मालिका चित्रपटाकडे वळायचं अशा कलाकारांवर त्यांनी नाराजी दाखवली आहे.
एका मुलाखतीत भरत जाधव म्हणाले, 'एकदा नाटक करून बघूया असं म्हणत नाटकाकडे वळणारे आणि नंतर सोडून निघून जाणारे अशी लोकं इथे टिकत नाहीत. रंगभूमीसाठी काहीतरी करायचंय अशी जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही इथे काम करू शकता. मी मुद्दाम सांगतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं मला नाटक करायचंय, कधी बोलवा मला नाटक करायचंय. मग कळतं की नाही माझी सिरीयल आलीये माझं काम आलंय मी निघालीये, निघालो. मग कशाला बोलता तुम्हाला नाटक करायचंय.'
ते पुढे म्हणाले,'अहो नाटकासाठी खूप मोठं योगदान लागतं. संपूर्ण टीम तुमच्यावर अवलंबून असते. काही प्रयोग ठरलेले असतात. ते प्रयोग करणं गरजेचं असतं. दुसरं काम मिळालं की चला नाटक बंद करुया तर असं नाही करता येत. मग परत बोलू नका की मला नाटक करायचंय. येताच कशाला अशी लोकं मला माझ्या नाटकांमध्ये नकोच आहेत.'
नुकताच झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अशोक सराफ, पत्नी निवेदिता सराफ, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले अशा दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेते भरत जाधव यांनीही सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.