अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सिनेइंडस्ट्रीत त्याचं मोलाचं योगदान आहे. पण त्याला इथवर पोहचण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला होता. भरत जाधवने खूप परिश्रम करुन यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या आईवडिलांचा मोठा वाटा असल्याचे तो नेहमी सांगतो. एका मुलाखतीत भरत जाधव संघर्षाचे दिवस आठवून भावुक झालेला पाहायला मिळाला होता. त्यांची ती जुनी मुलाखत आता पुन्हा व्हायरल होत आहे.
सह्याद्री वाहिनीवरील दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या दुसरी बाजू या कार्यक्रमातील भरत जाधवचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने वडिलांचा झालेला अपमान पण त्यांचा मिळालेला खंबीर पाठींबा याविषयी सांगितले आहे. भरत जाधवचे वडील मुंबईत टॅक्सीचालक होते. त्याचे वडील कोल्हापूरमधून १९४८ मध्ये मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. वडिलांच्या टॅक्सीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. वडिलांना दिवसाला १०० रुपये मिळायचे. तर भरत जाधव त्या काळात चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी धडपडत होता. तेव्हा घडलेला एक किस्सा या अभिनेत्याने सांगितला आहे.
वडिलांना सांगितलं टॅक्सी चालवू नका
एके दिवशी रात्री वडिलांनी भरत जाधवला तुझे नाटक शिवाजी मंदिरला विचारले होते का असे विचारले. यावर त्याने हो म्हटले. तेव्हा भरत जाधवच्या वडिलांच्या टॅक्सीत काही प्रवासी त्याचेच नाटक पाहण्यासाठी चालले होते. त्यांना त्या नाटकाला जाण्यासाठी उशीर झाला म्हणून त्यांनी वडिलांचा अपमान करत त्यांना शिव्या दिल्या होत्या. पण आपल्या मुलाच्याच नाटकाला जाण्यासाठी भांडत आहेत. म्हणून भरतचे वडील त्यांना काही बोलले नाहीत. त्यांनी शांत बसून त्या लोकांच्या शिव्या खाल्या. पण वडिलांचा हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्या रात्री भरतने वडिलांनी तुम्ही यापुढे टॅक्सी चालवू नका असे सांगितले.
मात्र वडिलांनी ठेवली एक अट
वडिलांना टॅक्सी चालवून दिवसाचे १०० रुपये मिळायचे तर भरतला नाटकाच्या एका शो साठी १०० रुपये मिळायचे. तेव्हा मी दिवसातून तीन शो केले तर घरात ३०० रुपये येतील असे म्हणून भरतने वडिलांना टॅक्सी चालवणे बंद करण्याची विनंती केली. पण वडिलांनी मी टॅक्सी चालवणार नाही, पण ती विकणार किंवा कोणाला देणारही नाही अशी अट ठेवली. कारण उद्या नाटकाचा भरोसा नाही. उद्या नाटक नाही चालले तर काय करायचे अशी चिंता त्यांना होती. यानंतर सहा महिने टॅक्सी चाळीत तशीच उभी होती असे अभिनेत्याने सांगितले.