उत्तम अभिनय, नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री भार्गवी चिरमुले(Bhargavi Chiramule)ने कलाविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या कामासंदर्भातील नव नवीन माहिती ती चाहत्यांना देत असते. आता एका वेगळ्या अंदाजात ती आपल्यासमोर येणार आहे.संदेश सुधीर भट सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे निर्माते मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये आहेत. यात भार्गवी ‘राधा’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही व्यक्तिरेखा सर्वसामान्यांचे प्रतीक आहे. यात भार्गवीचा पारंपरिक शृंगारिक अंदाज पहायला मिळतोय.
‘येतोय तो खातोय’ या लोकनाटयात अभिनय आणि नृत्य यांचा मिलाफ असल्याने अभिनय आणि नृत्याची आपली आवड एकत्रित दाखवता येत असल्याचा आनंद भार्गवी व्यक्त करते. हे पूर्णपणे वगनाट्य असून आधुनिक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. गण, गवळण, लावणी, कटाव असे सर्व प्रकार यात पाहायला मिळणार आहेत.
याबद्दल भार्गवी सांगते की, आजपर्यंत मी गावरान ठसक्याच्या भूमिका केल्या नव्हत्या ‘येतोय तो खातोय’ नाटकाच्या निमित्ताने अशी वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. जी माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचे भार्गवी सांगते. या नाटकासाठी भाषेचा लहेजा खूप महत्त्वाचा होता. त्यासाठी मी बरीच मेहनत घेतली असून माझ्या भूमिकेतून गावरान भाषेचा गोडवा रसिकांना अनुभवयाला मिळेल.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित या नाटकात भार्गवी चिरमुले सोबत हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वांबुरकर, महेंद्र वाळुंज हे कलाकार असणार आहेत. अजित परब, संज्योती जगदाळे, संपदा माने यांचा स्वरसाज नाटकातील गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. ढोलकीसाठी प्रणय दरेकर तर हार्मोनियमसाठी, दुर्गेश गोसावी यांनी वाद्य वृंदाची साथ दिली आहे