TDM Marathi Movie: 'टीडीएम' (TDM Marathi Movie) हा मराठी चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची सध्या जबरदस्त चर्चा आहे. या चित्रपटात दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. कालिंदी ही पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. हिरोईन वगैरे व्हायचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. रूममेटकडून तिला चित्रपटाबद्दल कळलं. मग रूममेटच्या आग्रहाखातर तिने फोटो पाठवला. यानंतर तिची स्क्रीनटेस्ट झाली. ऑडिशन झाली. यानंतर अनेक दिवसानंतर तिला तिचं सिलेक्शन झाल्याचं कळलं. पृथ्वीराजची स्टोरी तर याहूनही भन्नाट आहे.
होय, सिनेमात फक्त २ मिनिटांचा का होईना एखादा लहानसा रोल मिळावा, अशी त्याची इच्छा होती. पण पृथ्वीचं नशीब इतकं जोरदार की, त्याला २ तासांचा अख्खा सिनेमा मिळाला. भाऊराव कऱ्हाडे यांनी याच पृथ्वीराजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पृथ्वी तरूणांना स्वप्नं पाहण्याचं आवाहन करतोय. स्वप्न पाहिली पाहिजे, ती खरी नक्कीच होतात, असं त्याने म्हटलं आहे.
शेती, प्रॉडक्शन, ऑफिस बॉय ते नायक...पृथ्वीराज हा सिनेमाच्या नायकाची स्टोरी एकदम भन्नाट आहे. तो आधी गावाकडे शेती करायचा. पण सिनेमाची आवड होती. मुंबईत फिल्म सिटीत काही काम मिळतं का, दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा सिनेमाचं शूटींग सुरू असताना पृथ्वीराज असाच सहज म्हणून सेटवर गेला होता. भाऊराव व त्याची काहीही ओळख नव्हती. बबन या चित्रपटाच्या वेळी त्याने भाऊराव यांना गाठलं. मला प्रॉडक्शनला तरी काम द्या, असं तो म्हणाला.
भाऊराव यांनी त्याला प्रॉडक्शनला काम दिलं. बबनच्या हिरोचा बॉय म्हणून पृथ्वीराजने काम केलं. बबनचं शूट संपल्यानंतर सगळे पुण्याला पांगले. पृथ्वीराज मात्र गावाला परतला. पण तिथे त्याला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा भाऊराव यांच्याकडे गेला आणि मला काम द्या, मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणत त्याने पुन्हा विनंती केली. भाऊराव यांनी त्याला ऑफिस बाॅय म्हणून काम दिलं. पृथ्वीराज त्यांच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करू लागला. हा ऑफिस बॉय भाऊरावांच्या सिनेमाचा हिरो बनेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खुद्द पृथ्वीराजनेही तशी अपेक्षा केली नव्हती. पण पृथ्वीराजमध्ये असे काही गुण होते की, हाच आपला हिरो यावर भाऊराव ठाम होते. तू तयारी कर, असं त्यांनी पृथ्वीराजला सांगितलं. आपल्याला छोटीमोठी भूमिका मिळेल, अशी पृथ्वराजची अपेक्षा होती. पण तूच लीड भूमिका करताय, असं त्याला सांगितलं गेलं, तेव्हा क्षणभर त्याचाही विश्वास बसेना. सर आपली फिरकी घेत आहेत, असंच त्याला वाटलं. पण भाऊराव यांना पृथ्वीराजमध्ये वेगळं काही दिसलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला हिरो म्हणून निवडलं आणि त्यांची निवड योग्य ठरली...