TDM New Song Man Zhala Malhari : 'ख्वाडा', 'बबन' चित्रपटानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा (Bhaurao Karhade) 'टीडीएम' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या सिनेविश्वात रोमँटिक गाण्यांची क्रेझ पाहायला मिळतेय. अशातच 'टीडीएम' या चित्रपटातील एका रोमॅन्टिक गाण्याने धुमाकूळ घातलाय. एक फुल हे या चित्रपटातील गाणं सोशल मीडियावर हिट झालं आहे. आता यांत भर घालायला या चित्रपटातील दुसरं रोमँटिक गाणं सज्ज झालं आहे. 'मन झालं मल्हारी' असं गाण्याचं नाव असून युवक युवतीच्या नात्याची गुंफण उलगडणार हे गाणं नुकतंच रिलीज झालं.
'टीडीएम' सिनेमाचा नायक पृथ्वीराज आणि नायिका कालंदी यांचा रोमॅन्टिक अंदाज या गाण्यात पाहायला मिळतोय. प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचं विषय असला तरी प्रेयसी आणि प्रियकराची प्रेमाची व्याख्या ही इतर नात्यातील प्रेमापेक्षा काहीशी निराळीच असते, याच हुबेहूब वर्णन या गाण्यातून घडतंय. प्रेयसी आणि प्रियकराच एकमेकांवर असलेलं प्रेम अगदी अचूक हेरत या गाण्यातून मांडलंय. गाण्याच्या शब्दांमध्येच इतका जिव्हाळा आहे की आपसूक हे गाणं ओठावर रेंगाळतय. 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं आज ट्रेंडिंग मध्ये आहेच आता 'मन झालं मल्हारी' हे गाणं ही प्रेक्षकांसमोर आलं असून रसिकांच्या दिलावर राज्य करतंय.
या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत. 'टीडीएम' चित्रपटातील नवखे चेहरे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदीने या गाण्यावर धरलेला ठेका काळीज घायाळ करणारा आहे. कालिंदी आणि पृथ्वीराज यांचा हा पहिलाच सिनेमा आहे, हे सांगूनही आश्चर्य वाटेल, अशी त्यांची निरागसता, अप्रतिम अभिनय गाण्यात पाहायला मिळतोय. साहजिकच ही किमया नामवंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय.