भाऊ कदम यांनी आज मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अभिनयाने त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंगचे नेहमीच कौतुक केले जाते. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांना मिळाले आहे. ते सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात ते दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्यांचे फॅन झाले आहेत.
भाऊ कदम यांनी टाइमपास, टाइमपास 2, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.भाऊ कदम यांचा जन्म 12 जून 1972 चा असून त्यांचे बालपण मुंबईतील वडाळा येथे गेले आहे. वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये ते राहात असत. त्यांचे शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झाले. पण त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांना वडाळ्यातील त्यांची जागा सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेले. त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केलेली आहेत. पण अभिनय हे नेहमीच त्यांचे पहिले प्रेम होते.
अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यांनी रंगभूमीवरून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका केल्या. जाऊ तिथे खाऊ हे त्यांचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे त्यांच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
फू बाई फू या कार्यक्रमाने भाऊ यांना एक ओळख मिळवून दिली. पण या कार्यक्रमाची ऑफर त्यांनी दोनदा नाकारली होती असे म्हटले जाते. या कार्यक्रमानंतर त्यांना अनेक ऑफर मिळायल्या लागल्या. त्यांनी तुझं माझं जमेना या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.