Join us  

प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 4:55 PM

'घरत गणपती' सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या टीमने खास सरप्राइज दिलं. थिएटरमध्येच भूषण आणि रुपेशने 'घरत गणपती' सिनेमातील 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर डान्स केला.

कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरेचं दर्शन घडवणारा 'घरत गणपती' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमातील गाणी हिट झाली होती. तर ट्रेलरने 'घरत गणपती' सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो. कोकणातील प्रत्येक घरातील गणपतीची गोष्ट सांगणारा 'घरत गणपती' सिनेमा प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटत आहे. त्यामुळेच हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. 

ठिकठिकाणी 'घरत गणपती' सिनेमाचे शोज हाऊसफूल होत आहेत. अशाच एका सिनेमागृहातील व्हिडिओ समोर आला आहे. 'घरत गणपती' सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या टीमने खास सरप्राइज दिलं. या व्हिडिओत भूषण प्रधान, रुपेश बने हे कलाकार दिसत आहेत. थिएटरमध्येच भूषण आणि रुपेशने 'घरत गणपती' सिनेमातील 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर डान्स केला.  या गाण्याची ते हुक स्टेप करताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तर थिएटरमधील प्रेक्षकही त्याला साथ देताना दिसत आहेत. 

'घरत गणपती' सिनेमातून कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरा या अत्यंत जवळच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. गणेशोत्सवातील कोकणातील मज्जा मस्ती आणि परंपरा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा हा आगळ्या वेगळ्या विषयाचा सिनेमा आहे. या सिनेमात भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, समीर खांडेकर या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेत्री निकिता दत्ता या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नवज्योत बंदिवाडेकर यांनी केलं आहे. २६ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानमराठी अभिनेतासिनेमा