अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) मराठी सिनेसृष्टीत सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या आवाजामध्येही वजन आहे. शिवाय त्याची शरीरयष्टी पाहून तो खरोखरंच किती फिट आहे याचा अंदाज येतो. भूषणने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगितलं. लहानपणी तो अगदी बारीक होता त्याला काडी पहलवानही म्हणायचे. नंतर त्याच्यात सुधारणा झाली ती कशी याचा त्याने खुलासा केला. तसंच सिनेमांमध्ये भूमिका करताना गरज नसताना शर्टलेस सीन देत नाही असंही तो म्हणाला.
'मिरची मराठी' मराठीला दिलेल्या मुलाखतीत भूषण प्रधान म्हणाला, "मी शाळेत असताना खूप बारीक होतो. पाचवीत कावीळ झाली आणि नंतर मी बारीक झालो. त्यात उंची वाढत असल्याने आणखी बारीक दिसत होतो. मला सगळे काडी पहलवान वगरे म्हटलं जायचं. कॉलेजमध्ये एकेकाच्या मस्त शरीरयष्टी होत्या. मीही तेच ध्येय ठेवलं होतं. मला एकही जोर मारता यायचा नाही. मग या इंडस्ट्रीत यायचं म्हणून बॉडी असली पाहिजे हे माझं कधीचा कारण नव्हतं. तर एकंदर फिट राहायचं म्हणून माझं ते ध्येय होतं. यासाठी मी प्रोटीन्स, स्टिरॉइड्स अशा सवयी न लावता केवळ व्यायाम केला. मला कोणतंही व्यसन नव्हतं. आतून फिट राहणं, चांगली जीवनशैली फॉलो करणं हे तेव्हापासून सुरु आहे म्हणून आज माझा असा फिटनेस आहे. आज सगळ्यांना चांगली बॉडी बनवायची घाई झाली असते. त्यात ते चुकीच्या गोष्टींचं सेवन करतात. पण मला कधीच घाई नव्हती. मी योग्य पद्धतीने हे बनवलं. आजही माझा फिटनेस परफेक्ट नाही आणि तो परफेक्ट नाही म्हणूनच हे फिटनेस रुटीन सातत्याने सुरु राहिलं आहे."
फिटनेसचा करिअरमध्ये कसा फायदा झाला यावर तो म्हणाला, "मी आतापर्यंत फक्त दोन भूमिकांसाठी शर्टलेस शूट केलं आहे. एक म्हणजे गोंद्या आला रे मधील दामोदर हरी चाफेकरांची भूमिका आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. इतर कोणत्याच भूमिकांसाठी मी उगाच शर्टलेस शूट केलेलं नाही. बऱ्याचदा मला विचारणा झाली की आपण तुमचा एक शॉवर सीन दाखवू. मी थेट नाही म्हटलं. सिनेमा नाही केला तरी हरकत नाही कथेची गरज नाही त्यामुळे मी करणार नाही."