Join us

'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण; नाटकाचं करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 4:16 PM

Maithili javkar: नाटकातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मैथिलीला गायिका वैशाली सामंत हिचीदेखील साथ मिळाली आहे.

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे मैथिली जावकर (maithili javkar). उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच मैथिली एक निर्मातीदेखील आहे. विशेष म्हणजे आता मैथिलीने तिचा मोर्चा लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळवला असून तिचं  ‘अशीच आहे चित्ता जोशी’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी तिने पार पाडली आहे. या नाटकातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मैथिलीला गायिका वैशाली सामंत हिचीदेखील साथ मिळाली आहे. गाण्यातून आणि संगीतातून आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या वैशालीने प्रथमच एका नाटकासाठी गायन आणि संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. ह्या नाटकातील धाकड गीताला (थीम साँग) वैशालीने संगीत दिलं असून तिने स्वत: ते गायलं आहे. 

राज्यस्तरीय नाट्य लेखनाच्या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला होता. त्यात १७५ स्क्रिप्टमधून माझं हे नाटक तिसरं आलं. यातूनच मला हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची  प्रेरणा मिळाली. माझ्या एका चित्रपटाच्या निमित्ताने वैशालीची भेट झाली होती. तिची एनर्जी आणि कामाचं पॅशन नाटकाच्या गाण्यासाठी परफेक्ट वाटली. आणि खरंच तिने हे गाणं खूप मस्त सादर केलं आहे, असं मैथिली म्हणाली.

"हे गाणं करताना खूप धमाल आली. राजेश बामुगडे यांनी हे गीत खूप  चांगल्यारीतीने शब्दबद्ध केलं आहे. आपल्या हक्कासाठी लढणार्‍या स्त्री पात्रासाठी अतिशय चपखल असं हे गाणं  करताना एका स्त्री दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन मला अधिक भावला. त्यामुळे हे गाणं आणि मैथिली सोबत काम करणं माझ्यासाठी ही खूप छान अनुभव होता", असं वैशाली सामंत म्हणाल्या.

दरम्यान, ओम साईनाथ प्रोडक्शन्स निर्मित, संस्कार भारतीच्या सहयोगाने, स्मित हरी प्रकाशित वेगळ्या धाटणीच्या या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असून मैथ्थिली जावकर सोबत रणजीत जोग, रुचिर गुरव, रचना कदम यांच्याही नाटकात भूमिका आहेत.

टॅग्स :नाटकसेलिब्रिटीबिग बॉस मराठी