Join us  

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची सिनेमात एन्ट्री, दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 6:16 PM

मालिकाविश्व गाजवलेली अभिनेत्री झळकणार रुपेरी पडद्यावर, साकारणार मुख्य भूमिका

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिकांमध्ये काम केलेली रुचिरा 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आली होती. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता रुचिरा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मराठी सिनेमात रुचिरा जाधवची वर्णी लागली आहे. 

रुचिरा 'बाबू' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. रुचिरा या सिनेमात सुप्रिया ही भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी रुचिराने या सिनेमातील तिच्या लूकचं पोस्टर शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रुचिराला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. तिला चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. रुचिराने 'माझ्या नवऱ्याची बायको', 'ठरलं तर मग' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी ती एक होती. 

दरम्यान, 'बाबू' सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. हा आगरी कोळी भाषेतील पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमात नेहा महाजन, स्मिता तांबे, संजय खापरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मयूर शिंदेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसिनेमा