Join us

‘बिनधास्त, मनमौजी स्वराची भूमिका जगतेय’- दिप्ती देवी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 10:52 AM

अबोली कुलकर्णी नाटक, मालिका, चित्रपट असा यशस्वी वाटचाल करणारी मराठी अभिनेत्री दिप्ती देवी ही आगामी ‘कंडीशन्स अप्लाय’ चित्रपटात मुख्य ...

अबोली कुलकर्णी नाटक, मालिका, चित्रपट असा यशस्वी वाटचाल करणारी मराठी अभिनेत्री दिप्ती देवी ही आगामी ‘कंडीशन्स अप्लाय’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘पक पक पकाक’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका केली होती. ‘मला सासू हवी’,‘अंतरपाट’,‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ या मालिकांमधून तिने उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. * तुझ्या ‘कंडिशन्स अ‍ॅप्लाय’ चित्रपटातील भूमिकेविषयी काय सांगशील?- ‘स्वरा’ ही व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारते आहे. ती एक रेडिओ जॉकी आहे. बिनधास्त, मनमौजी अशी तिची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली. तिला लग्न करायचं नाहीये, तिच्या अटींना मान्य करणाऱ्या मुलाशीच तिला आयुष्य घालवायचंय असं तिचं म्हणणं आहे. माझ्या स्वभावाच्या अगदी विरूद्ध अशी ही भूमिका आहे. विविधांगी भूमिका करायला मला तसंही आवडतं. त्यामुळे नक्कीच स्वराची व्यक्तिरेखा करताना मजा आली. *  सुबोध भावेसोबत तू प्रथमच काम केलं आहेस. कसं वाटतंय? - सुबोध हा माझा सहकलाकार होण्याअगोदर माझा चांगला मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांसोबत कनेक्ट असतो. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला एकत्र येता आलं, काम करता आलं, हे माझं भाग्यच. तो एक कलाकार म्हणून चांगला आहेच पण, तरीही एक माणूस म्हणून खुप चांगला आहे. त्याच्याकडून खुप काही शिकण्यासारखं आहे. * चित्रपट हलकाफुलका, लाईट मूडचा व्हावा म्हणून सध्या बॅकग्राऊंड म्युजिकवर जास्त भर दिला जातो. याविषयी काय सांगशील?- सध्या मराठी इंडस्ट्री ही खुपच अत्याधुनिक झाली आहे. चित्रपटाचे सीन्स, शूटिंग, संगीत यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आता एकंदरितच चित्रपट पूर्ण व्हायला पूर्वीसारखे कष्ट पडत नाहीत. प्रेक्षक त्यांच्या रोजच्या कटकटीपासून दूर म्हणून चित्रपट पहावयास येत असतो. त्यांना चित्रपट पाहताना टेन्शन यायला नको याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे थीम, बॅकग्राऊंड म्युझिक आणि सीन्स हे अत्यंत लाईट आणि हलकेफुलके  बनवण्याकडे दिग्दर्शकाचा कल असतो. * नाटक, मालिका, चित्रपट यांपैकी कोणते माध्यम तुला जास्त जवळचे वाटते?- इंडस्ट्रीत येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला नाटक-मालिका- चित्रपट असा प्रवास करावाच लागतो. त्याशिवाय तो एक उत्कृष्ट कलाकार होऊच शकत नाही. त्यामुळे त्याच्या पदरात आलेलं प्रत्येक काम, भूमिका त्याला करावीच लागते. भूमिका ही कधीच परफेक्ट नसते. तिला परफेक्ट करावं लागतं. त्यामुळे माध्यम कोणतंही असो आम्हा कलाकारांसाठी भूमिका महत्त्वाची असते. तरीही मालिका हे माध्यम मला जास्त आवडतं कारण त्यामुळे आम्ही कलाकार पे्रक्षकांच्या जास्तीत जास्त जवळ राहू शकतो. * तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?- आत्तापर्यंत मी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आणि प्रमोशनमध्ये व्यस्त होते. सध्या तरी माझ्याकडे कुठलाही प्रोजेक्ट नाही. पण, होय नक्कीच लवकरच मी एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येण्याचा प्रयत्न करेन. एक नवा विषय, सहकलाकार आणि नव्या भूमिकेसह भेटेन एवढेच सध्या तरी सांगू शकते.* तुझा ड्रीम रोल कोणता? - एखाद्या कलाकारासाठी भूमिका मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मग ती कुठलीही असो. एखादा चित्रकार ज्याप्रमाणे त्याचे चित्र साकारतो त्याप्रमाणे कलाकारांना भूमिकेला अभिनयानं सजवावं लागतं. त्यामुळे आत्तापर्यंत मला मिळालेले रोल हे माझ्यासाठी स्वप्नवतच होते.