मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली छाप उमटविली आहे. अमृता सुभाषचा आज ४२ वा वाढदिवस असून तिचा जन्म १३ मे १९७९ साली झाला. अमृता सुभाष उत्तम अभिनेत्रीशिवाय एक लेखिका, गायिका आणि संगीतकारदेखील आहे. अमृताला अभिनयाचे बाळकडू तिची आई ज्योती सुभाषकडूनच मिळाले.
अमृता सुभाषचे लग्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. या नात्याने सोनाली अमृताची नणंद आहे.
संदेश आणि अमृताचे लव्ह मॅरेज आहे. अमृताचा नवरा संदेश स्वत: एक लेखक, अभिनेता आणि इंजिनिअरही आहे.
आई ज्योती सुभाष यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. दिल्लीत एनएसडीत अमृता सत्यदेव दुबेंकडून ती अभिनयातील बारकावे शिकली. तिथे रंगभूमीवर हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले. महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला रंगभूमीवर 'ती फुलराणी' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही भूमिका त्यापूर्वी भक्ती बर्वे यांनी साकरली होती. या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
२००४ मध्ये 'श्वास' या चित्रपटातून अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. श्वास सिनेमाला ५१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. शिवाय ऑस्करमध्येही या सिनेमाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अवघाची संसार या मालिकेतील भूमिकेतून अमृता घराघरात पोहचली.
अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. 'जाता जाता पावसाने' हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस (२०१०), अजिंठा (२०१२) या सिनेमांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे.
अमृता एक संगीतकारसुद्धा आहे. निताल (२००६) आणि तीन बहनेसाठी तिने संगीत दिले आहे. शिवाय सारेगमप या मराठी सांगितिक कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमात टॉप ५ पर्यंत तिने मजल मारली होती.
अमृताने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. रमन राघव २.० या सिनेमात अमृता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. याशिवाय ती गली बॉय सिनेमातही झळकली आहे.
अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबत आजी, झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहिर या सिनेमांमध्ये काम केले आहे. आजी या सिनेमात ज्योती सुभाष यांनी अमृताच्या आजीची भूमिका वठवली होती. तर२००९ मध्ये आलेल्या गंध या चित्रपटात या दोघी आई-मुलीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.