सध्या सिनेविश्वात एका बायोपिकची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नितीन गडकरींवर येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'गडकरी' असं आहे. या चित्रपटातून गडकरींच्या राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. महामार्ग, रस्ते आणि पाठमोरे नितीन गडकरी असं या चित्रपटाचं बोलकं पोस्टर आहे. हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक अनंत भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केलं आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे. देशातील महामार्गांना दिशा देणाऱ्या रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी भारताचे हायवेमॅन म्हणूनही ओळखले जातात. राजकारणातील सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाबाबत आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.