Join us

‘कलरफुल्ल’ जमान्यात ब्लॅक एंड व्हाईट ‘कच्चा लिंबू’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2017 9:50 AM

ब्लॅक एंड व्हाईट किंवा कृष्णधवल सिनेमांचा काळ संपून आता बरीच वर्षे झाली आहेत. कलरफुल्ल सिनेमांचं पर्व सुरु झाल्यापासून ब्लॅक ...

ब्लॅक एंड व्हाईट किंवा कृष्णधवल सिनेमांचा काळ संपून आता बरीच वर्षे झाली आहेत. कलरफुल्ल सिनेमांचं पर्व सुरु झाल्यापासून ब्लॅक एंड व्हाईट सिनेमा मागे पडले आहेत. मात्र आता मराठी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा ब्लॅक एंड व्हाईट युग अवतरणार आहे. कच्चा लिंबू हा आगामी मराठी सिनेमा ब्लॅक एंड व्हाईटमध्ये झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असून दिग्दर्शक रवी जाधवही अभिनेता म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. रवी जाधव या सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. दुसरीकडे अभिनेता प्रसाद ओकसाठीही कच्चा लिंबू हा सिनेमा खास आहे. प्रसाद दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करत आहे. कच्चा लिंबू सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद करत आहे. आपल्या नव्या इनिंगची सुरुवात काही तरी वेगळ्या किंवा अनोख्या पद्धतीने व्हावी असं प्रत्येक नव्या दिग्दर्शकाला वाटत असतं. त्यामुळे कच्चा लिंबू सिनेमा ब्लॅक एंड व्हाईटमध्ये साकारण्यात येणार असल्याचे प्रसादनं सांगितलंय. मात्र सिनेमा ब्लॅक एंड व्हाईट करण्यामागे एवढंच कारण नसल्याचं प्रसादनं स्पष्ट केलं आहे. सिनेमाच्या कथेची ही गरज असल्याचे प्रसादनं स्पष्ट केलं आहे. या सिनेमात सोनाली एक मुख्य व्यक्तीरेखा असून तिच्या बेरंग आयुष्याचं दर्शन ब्लॅक एंड व्हाईट कच्चा लिंबू सिनेमातून घडणार आहे. सिनेमात सोनालीचं फक्त बेरंग आयुष्यच दाखवण्यात येणार असून तिच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीही दाखवल्या जाणार आहेत.तिच्या आयुष्यातील चांगला काळ हा कलरफुल्ल रुपात दाखवला जाणार आहे. या अनोख्या प्रयोगाबाबत आणि सिनेमाविषयी प्रसादनं सोनालीकडे ज्यावेळी विचारणा केली त्यावेळी ती काहीशी साशंक होती. मात्र सिनेमाचे रफ कट पाहिल्यानंतर सोनाली भारावून गेली. या सगळ्याचे श्रेय तिनं प्रसाद ओक आणि सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरीला दिलं आहे. कलाकाराला कायम काहीना काही वेगळे प्रयोग करण्याची गरज असते आणि 'कच्चा लिंबू' सिनेमाच्या निमित्ताने ती मिळाल्याचं सोनालीनं सांगितलं.