Join us  

'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 1:15 PM

बोगदा हा सिनेमा आई आणि मुली यांच्या नातेसंबधावर आधारित आहे. या चित्रपटात मृण्मयी मुलीच्या तर सुहास जोशी आईच्या भूमिकेत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित, दिग्दर्शित 'बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच टीझर लाँच करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर हा टीझर लाँच करण्यात आला असून या टीझरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बोगदा हा चित्रपट खूप वेगळा असल्याचे जाणवत आहे असे अनेकांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यां दोघांची बोगदा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. त्या दोघींनी या आधी कुंकू या मालिकेत काम केले होते. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. आता त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

बोगदा हा सिनेमा आई आणि मुली यांच्या नातेसंबधावर आधारित आहे. या चित्रपटात मृण्मयी मुलीच्या तर सुहास जोशी आईच्या भूमिकेत आहेत. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर मध्ये त्यांच्यातील हळूवार नाते आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळे या टीझरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहेत. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून करण कोंडे,  सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे.

मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाच्या दिग्दर्शिका निशिका केणी सांगतात की,' स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे'. इतकेच नव्हे तर, आशयसमृद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या 'बोगदा' सिनेमाला 'व्हीस्लिंग वूड'च्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.