मराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. याच पठडीतला नवनाथांच्या महात्म्यावर आधारित ‘बोला अलखनिरंजन’ हा भक्तीमय चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची झलक व संगीत अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय नाथपंथीय महासंघ, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जियाजी नाथ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. ‘मातृपितृ फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घनशाम येडे यांनी सांभाळली आहे.
या प्रसंगी बोलताना दिग्दर्शक घनशाम येडे सांगतात की, नवनाथांचा हा चित्रपट माझा ध्यास होता. त्यांच्याच कृपेने माझी स्वप्नपूर्ती झाली असून वैचारिक उद्बोधन आणि रंजकता यांचा सुरेख मेळ या चित्रपटात प्रेक्षकांना पहाता येईल. प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणारा हा चित्रपट असेल असा विश्वास व्यक्त करतानाचा दिग्दर्शक घन:श्याम येडे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला दाद देत घनशाम येडे यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाला कलाकारांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.तीन सुरेख गीतांचा भक्तीमय नजराणा ‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटात आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे. नाथ संप्रदायाचे महात्म्य, त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहे हे सांगताना शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यच्या नवनाथांवरच्या निस्सीम श्रद्धेची किनार या चित्रपटाला जोडण्यात आली आहे. या संप्रदायाच्या शिकवणीने जीवनमान कसे चांगले होऊ शकते, विपरीत गोष्टींवर कशी मात करता येऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. अमोल कोल्हे, सिया पाटील, नागेश भोसले, दिपक शिर्के, दिपाली सय्यद, गायत्री सोहम, मिलिंद दास्ताने, प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घनशाम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटाचे सहनिर्माते सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घनशाम येडे यांनी लिहिली आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज यांचे आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांचे आहे. वेशभूषा, कार्यकारी निर्मात्या चैत्राली डोंगरे आहेत. रंगभूषा किरण सावंत यांची आहे. नृत्यदिग्दर्शन बॉबी खान, संग्राम भालेकर यांनी केले आहे. ध्वनी संयोजनाची जबाबदारी अनिल निकम व कैलास पवार यांनी सांभाळली असून व्हि.एफ.एक्स रितेश दप्तरी यांचे आहे. सहदिग्दर्शन चार्ल्स गोम्स, संदीप शितोळे यांनी केले आहे. देवदास भंडारे, दिपक साळुंखे यांचे कलादिग्दर्शन चित्रपटाला लाभले आहे. शिवाजी दडस आणि नारायण माळशिकारे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती सहाय्यक संजय कोळी, योगेश टेंमगिरे आहेत. निर्मिती व्यवस्था अनिरुद्ध दुभाषी, श्रीकांत बडवे (महाजन) यांची आहे.