Join us

comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 3:28 PM

Genelia Deshmukh: 'तुझे मेरी कसम' (tujhe meri kasam) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट केले. मात्र, गेल्या १० वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता.

महाराष्ट्राची लाडकी सूनबाई या नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसुझा (Genelia Deshmukh).  २००३ साली 'तुझे मेरी कसम' (tujhe meri kasam) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट केले. मात्र, गेल्या १० वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. त्यामुळे जेनेलियाला पुन्हा कधी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार हा एकच प्रश्न वारंवार चाहत्यांमध्ये उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, प्रेक्षकांची ही प्रतिक्षा आता संपली असून जेनेलिया तब्बल १० वर्षांनंतर कलाविश्वात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे यावेळी जेनेलिया केवळ कलाविश्वात पदार्पण करत नाहीये तर ती चक्क मराठी कलाविश्वात पहिलं पाऊल टाकत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या जेनेलियाने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मराठी कलाविश्वात पदार्पण करत असल्याचं सांगितलं आहे. नुकताच तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून यानिमित्ताने तिने ही घोषणा केली आहे.

'या' मराठी चित्रपटातून जेनेलिया करणार कलाविश्वात पदार्पण

मुंबई फिल्म कंपनीच्या सहाव्या मराठी चित्रपटातून जेनेलिया पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण करत आहे. 'वेड' असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यापूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'वेड' हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शकाच्या रुपात

जवळपास २० वर्ष अभिनय कारकिर्द गाजवल्यानंतर रितेश देशमुख आता दिग्दर्शकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात जेनेलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्यासोबत अभिनेत्री जिया शंकरदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

काय आहे जेनेलियाची पोस्ट?

"आजपर्यंत अनेक भाषिक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तितकंच प्रेमही मिळालं. महाराष्ट्रातच माझा जन्म झाल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून एका मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी यासाठी मी वाट पाहत होते. मला एक अशी कथा हवी होती जी वाचल्यावर वाटेल, बास्स हेच हवं होतं. आणि, हे असंच घडून आलं. माझा पहिला मराठी चित्रपट. तब्बल १० वर्षांनंतर मी अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करतीये. आणि, माझ्या स्वप्नातील आणखी एक गोष्ट पूर्ण होतीये ती म्हणजे माझे पती रितेश देशमुख या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सोबतच जिया शंकरसारखी उत्तम सहकलाकार मला लाभली आहे,"  असं जेनेलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असंच राहू द्या. कारण या प्रवासात तुमची साथ असेल तर हा प्रवास आणखी छान होईल...'वेड'. 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखसिनेमाबॉलिवूडअजय-अतुल