मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर (mithila palkar). आपल्या उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्यामुळे मिथिलाने प्रत्येक प्रेक्षकाला आपलंसं केलं होतं. विशेष म्हणजे सतत हसतमुख राहणाऱ्या मिथिलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिथिलाच्या आजोबांचं निधन झालं आहे. मिथिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.
२६ मार्च रोजी मिथिलाच्या आजोबांनी वयाच्या ९४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मिथिला आणि तिच्या आजी-आजोबांच्या नात्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मिथिला दादरमध्ये तिच्या आजी-आजोबांसोबत राहत आहे. मात्र, तिच्या आजोबांच्या निधनामुळे तिच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मिथिलाने सोशल मीडियावर तिच्या आजोबांचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे.
"माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आणि मला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी असणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वीच आपल्याला सोडून गेले. त्यांच्याशिवाय असणारं आयुष्य मला ठाऊक नाही, कळणारही नाही. मला इतकंच ठाऊक आहे, की ते एक लढवय्ये होते. त्यांची आयुष्य जगण्याची उमेदच आता आपण साजरा करणार आहोत. ते माझ्यासाठी खास होते आणि कायम अग्रस्थानीच राहतील. खूप छान राहा भाऊ. आता स्वर्गातही आनंदी वातावरण असेल... तुमच्या त्या हसण्यामुळं... '', अशी पोस्ट मिथिलाने शेअर केली आहे.
दरम्यान, मिथिलाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. मिथिला आणि तिच्या आजोबांचं नातं फार निराळ होतं. त्यांच्या नात-आजोबा हे नातं कमी आणि मित्र-मैत्रिणीचं नातं जास्त होतं. त्यामुळे मिथिला तिच्या प्रत्येक यशात, आनंदात आपल्या आजोबांच्या नावाचा उल्लेख करायची.