पर्ण पेठे (Parna Pethe) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने रसिकांच्या मनावर छाप पाडली. ती 'विषय हार्ड' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यग्र आहे. नुकतेच तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले.
पर्ण पेठे आणि आलोक राजवाडेनं २९ फेब्रुवारी, २०१६ रोजी लग्न केलं. आलोक आणि पर्णने आपल्या लग्नाचा फार गाजावाजा केला नाही. अगदी साधेपणाने लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे कुटुंब आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केले. आता त्यांची लव्हस्टोरी सांगताना पर्ण म्हणाली की, आम्ही पुण्यात नाटक करायचो. झूम बराबर झूम माझी पहिली एकांकिका होती. वरूण नार्वेकरचं दिग्दर्शन होतं. यात आम्ही भावा बहिणीची भूमिका करत होतो. विहिर चित्रपटात पण आम्ही भावा बहिणीचीच भूमिका केली. अनेक वर्ष आमची ओळख होत गेली आणि बरेच वर्ष आम्ही नाटक कंपनी नावाचा ग्रुप चालवला. एकत्र भरपूर काम केले.
विषय हार्ड या दिवशी येणार भेटीला
गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली 'विषय हार्ड'ची निर्मिती केली आहे. कथा लेखनासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही सुमित यांनी केलं आहे. पर्ण पेठे आणि सुमित यांच्यासह हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत. हा चित्रपट ५ जुलैला भेटीला येणार आहे.