मनोरंजन विश्वात कथा-संकल्पना चोरी आणि स्वामित्व हक्काचा मुद्दा बऱ्याचदा वादाला तोंड फोडणारा ठरतो. काही दिवसांपूर्वी लेखिका-अभिनेत्री शिल्पा नवलकरांनी ‘सेल्फी’ नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप परितोष पेंटरवर केल्याने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला. नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या या मुद्द्याचा फटका बऱ्याचदा सिनेमाला बसतो. जोपर्यंत कायदेशीर बाजू सोडवल्या जात नाहीत, तोपर्यंत सिनेमाही लांबणीवर जातो.
मराठीच्या तुलनेत हिंदी सिनेसृष्टीत कथा चोरीची प्रकरणे खूप आहेत. विनोद मेहरा आणि रेखा अभिनीत ‘घर’ सिनेमाची कथा आपली असल्याचे अभिनेते विनोद ठाकूरांचे म्हणणे होते. ७० च्या दशकात हे प्रकरण गाजले होते. एकाच कथेवर चित्रपट बनवण्यावरून दिलीप कुमार-अमिताभ बच्चन अभिनीत ‘शक्ती’ आणि जितेंद्रच्या ‘फर्ज और कानून’ चित्रपटांमधील वाद गाजला होता. सलीम-जावेद यांनी लिहीलेल्या ‘हमशकल’ सिनेमात राजेश खन्नाने हस्तक्षेप केल्याने त्यांनी क्रेडीट लिस्टमधून नाव काढायला सांगितले. महेश कोठारेंच्या ‘वेड लावी जीवा’वरही कथाचोरीचे आरोप झाले होते. त्यामुळे आदिनाथ कोठारेचा महत्त्वपूर्ण चित्रपट असूनही नीट रिलीज होऊ शकला नव्हता. सई ताम्हणकरच्या ‘कांदे पोहे’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘सनई चौघडे’ ठेवाले लागले. एकांकीकांच्या संकल्पना घेऊन बऱ्याच चित्रपटांच्या कथा लिहिल्या जातात, पण त्याचे क्रेडीट मूळ लेखकाला मिळत नाही. लेखकाचे काम सर्वात अगोदर सुरू होते आणि सर्वात अगोदर संपते, त्यामुळे त्याची नंतर गरज भासत नसल्याने तो सोयिस्करपणे विसरला जातो. मराठीत लेखकांचे रेटकार्ड नसल्याचा बऱ्याचदा काही निर्माते गैरफायदा घेतात. लेखकाला टाईम आणि टॅलेंटनुसार मानधन मिळायला हवे असल्याची मागणी आहे. स्वत: लिहिलेली गोष्ट लेखक निर्मात्याशिवाय रजिस्टर करू शकत नाही हे बदलायला हवे. ज्याला गोष्ट सुचते त्याचा कॉपीराईट असायला हवा.
निर्मात्यांनी लेखकाच्या बेसिक हक्कांची पायमल्ली होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. कित्येकदा रजिस्ट्रेशनचा नियम पाळला जात नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद असलेल्या निर्मात्यांना सेन्सॉरसाठी लेखकाच्या एनओसीचा नियम लागू आहे. इम्पाचा सदस्य असलेल्या निर्मात्याला लेखकाच्या एनओसीचा नियम लागू नसल्याने निर्मात्यांना पळवाट मिळते आणि लेखकाचे नुकसान होते. कित्येकदा मानधनापेक्षा क्रेडीट लेखकासाठी खूप महत्त्वाचे असते.
.............................
हिंदीमध्ये रायटर्स असोसिएशनच्या नियमानुसार लेखकाचे मानधन...पाच कोटी रुपयांपर्यंत निर्मितीमूल्यांसाठी नऊ लाख रुपये१५ कोटी रुपयांपर्यंत निर्मितीमूल्यांसाठी १८ लाख रुपये१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्मितीमूल्यांसाठी २७ लाख रुपये.........................लेखकांच्या प्रमुख मागण्या...दिल्लीला होणारे कॉपीराईट रजिस्ट्रेशन मुंबईला व्हायला हवे.लेखकाला सुचलेले शीर्षक त्याला स्वत:च्या नावे रजिस्टर करता यावे.निर्मात्याकडून लेखकाला शीर्षकासाठी वेगळे मानधन मिळावे.गायक-संगीतकारांप्रमाणे लेखकांनाही रॉयल्टी मिळायला हवी.मालिकांच्या टायटल ट्रॅकमधील गीतांच्या ओळींचे मानधन गीतकारांना मिळावे............................
सिनेमापेक्षा टेलिव्हीजनसाठी एकसारखी मानधन पद्धती तयार करण्याची गरज आहे. इथे ९० दिवसांनी पैसे मिळतात. नवीन येणाऱ्या लेखकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. नाटकावरून प्रेरीत सिनेमाचे स्क्रीप्ट वेगळेच असते. माध्यमांतराचे संस्कार करावे लागत असल्याने नाटकावरून प्रेरीत असलेल्या चित्रपटाचे स्क्रीप्ट वेगळे असल्याचे सांगणे हे हास्यास्पद आहे. यासाठी मानाचि लेखकासाठी लढायला तयार असते.
- सचिन दरेकर (लेखक-दिग्दर्शक)...............................
लेखकाला स्वत:ला लाज असेल तर त्याने दुसऱ्याचे काहीही उचलताना निदान त्याचा नामनिर्देष करण्याचे तरी भान बाळगावे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हे टायटल असेच सुचणारे नाही. या टायटलमागे लेखकाची प्रतिभा, अभ्यास आणि व्यासंग आहे. त्याला डावलता येणार नाही. लेखकाला सेल्फ सेन्सॉर असायला हवा.
- विवेक आपटे (अध्यक्ष, मानाचि)..........................
वाद टाळण्यासाठी काय करावे...लेखकाने स्वत:ची कॉन्सेप्ट रजिस्टर करावी.निर्मात्यासोबत होणाऱ्या देवाणघेवाणीचा रेकॉर्ड ठेवायला हवा.मूळात लेखकांनी सावध आणि सजग असायला हवे.फसवले गेल्यावर उगाच बोंबाबोंब करू नये.लेखकाने कधीही भलत्या भ्रमात राहू नये...........................संकल्पना रजिस्टर करता येते का?एखाद्या वनलाईनमधला गोषवारा किंवा सारांश कथानक म्हणजे संकल्पना... गोष्टीतील कॅरेक्टर्स किती सारखी आहेत. गोष्टीची सुरुवात, मध्य आणि शेवट यात किती साम्य आहे. त्यातीला मूळ गाभा काय आहे हे पाहून संकल्पनेतील साम्य ठरते, पण संकल्पना रजिस्टर करण्याची तरतूद नाही. यासाठी गोष्ट लिहून स्टोरीलाईन रजिस्टर करता येते......................
लेखकाचे मानधन किती असावे?एखादा लेखक गोष्टीसाठी किती वेळ देतो आणि त्या वेळेची किंमत काय आहे हे प्रत्येक लेखकाच्या समाधानाची काय व्याख्या आहे त्यावर अवलंबून असते. लेखकाने मानधन किती घ्यावे हे व्यक्तीसापेक्ष आहे. लेखकाला किती मानधन असावे यासाठी मराठीत कोणतेही नियम नाहीत. यासाठी मानाचिने प्रयत्न सुरू केले असून, त्याचे ड्राफ्टींग सध्या सुरू आहे.