रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक म्हणजे 'दादा एक गुड न्यूज आहे'. सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात हे नाटक यशस्वी ठरलं आहे. तरुणाईला भावणारं हे नाटक लवकरच पन्नासावा प्रयोगांचा टप्पा पार करणार आहे. प्रिया बापट, उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने ह्या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शिन केले आहे.नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.
बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या निमित्ताने ह्या नाटकाचे टिझरही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहेत.
अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बहीण -भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम एका अनोख्या रूपात या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.