Chandramukhi marathi movie : ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) हा चित्रपट येत्या 29 एप्रिलला चित्रपटगृहांत झळकणार आहे. त्याआधी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या चंद्राला अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिला पाहायला सगळेच आतूर झाले आहेत. चंद्राची भूमिका अमृताने नुसती पडद्यावर साकारली नाही तर ती अक्षरश: जगली. यासाठी अपार कष्ट घेतले. अगदी नाक सुद्धा टोचून घेतलं. आता चंद्राचा आणि नाक टोचण्याचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच संबंध आहे. यासाठी अमृताची ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी.
अमृताने नथ आणि चंद्रमुखी नावाची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक किस्सा शेअर केला आहे. सोबत नाक टोचून घेतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
‘माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओकला सगळं ओरिजिनल हवं होतं... तेव्हा अमृता नाक टोचायचं.... क्लिपवाल्या नथी मी तुला घालू देणार नाही... असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं... आणि म्हणूनच अशा पद्धतीने मी अडीच वर्षांपूर्वीच नाक टोचलं.त्यानंतरही ते बुजलं...दुखलं...मग परत टोचावं लागलं... पण शूटिंगपर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली... त्यात पु.ना, गाडगीळ ह्यांनी खºया सोन्याच्या नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत असत की पॅक-अप नंतर त्यावरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो. तर चंद्राची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?’, असं अमृताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्रेक्षक म्हणून दर वीकेंडला आपण सिनेमे बघतो. चांगला की वाईट असा शेरा देऊन मोकळे होतो. पण त्यामागे कलाकार किती कष्ट घेतात, हे फार क्चचित जगासमोर येतं. अमृताने चंद्रासाठी किती काय सोसलं, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे.
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा प्रसाद ओक यांनी केला आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांनी संगीत दिलंय.