Smita Deo, Ramesh Deo : युट्यूब आणि खाद्यपदार्थ, मेजवानी, रेसिपीच्या दुनियेत चर्चेत असणारं एक नाव म्हणजे स्मिता देव (Smita Deo). त्यांची आणखी वेगळी ओळख करून द्यायची झाल्यास, त्या दिग्दर्शक अभिनय देव यांच्या पत्नी. शिवाय दिग्गज अभिनेते रमेश आणि सीमा देव यांच्या सूनबाई. स्मिता देव या एक लोकप्रिय लेखिका आणि युट्यूबर आहेत. विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींवर आधारित त्यांच्या अनेक व्हिडीओ, पाककृती आज जवळपास सर्वांच्या स्वयंपाकघरात केल्या जातात. नुकतीच स्मिता देव यांनी 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya ) या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 'रमेश देव कोणत्याही प्रकारचं डाएट करत नव्हते. जे आवडायचं ते पदार्थ ते अगदी मनसोक्त खायचे. गोड पदार्थ त्यांच्या आवडीचे. घरी केलेलं जेवण त्यांना विशेष आवडायचं,' असं स्मिता यांनी सांगितलं.
सासऱ्यांचा एक किस्साही त्यांनी आवर्जुन सांगितला. त्यांनी सांगितलं की, ' एके दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यांच्यासाठी मी पारंपरिक असा तांबडा पांढरा रस्सा करायला घेतला. मी स्वयंपाकघरात असताना बाबा आलेत. छोटी काय करतेय, मला जरा चव चाखायला दे, असं मला म्हणाले. मी त्यांना तांबडा पांढरा रस्सा चाखायला दिला. त्यांनी तो चाखला आणि अचानक ते रडू लागले. बाबा असे अचानक का रडताहेत, मला कळेना. नंतर त्यांनीच मला कारण सांगितलं. तू केलेल्या रस्स्याची चव घेतली आणि मला माझ्या आईनं केलेला रस्सा आठवला, असं ते म्हणाले. ' हे सांगताना स्मिता स्वतःही भावुक झाल्या होत्या.
प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं गेल्यावर्षी २ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्मिता देव या अभिनय देव यांच्या पत्नी आहेत. प्रसिद्ध शेफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्याा स्मिता देव यांनी ‘कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई’ हे पाकशास्त्रावरचं पुस्तक लिहिलं आहे. कारवारी आणि कोल्हापूर पदार्थ ही स्मिता यांची खासियत आहे. त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनेल देखील आहे.