Join us

'छत्रपती शिवरायांची मूल्यं...', 'हर हर महादेव' वादावर निर्मात्यांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 7:20 PM

हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादात अडकला आहे. राज्यात काही ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे.

हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादात अडकला आहे. राज्यात काही ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली. त्यानंतर आता झी स्टुडिओ आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सने अधिकृत स्टेटमेंट जाहीर केले.

 झी स्टुडिओ आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सने आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता! त्यांची मूल्ये हृद्याशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहचणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा आणि विचारांचा अभ्यास करून, संदर्भ घेऊन आम्ही हर हर महादेवची निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योद्ध्यांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल.

या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. आमचा राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्ण विश्वास आहे.