छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:55 PM2022-06-28T18:55:47+5:302022-06-28T18:56:24+5:30
Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच 'भिरकीट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विनोदीशैलीच्या माध्यमातून मनाला स्पर्शून जाणारा विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार झळकले असून सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. विशेष म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही या चित्रपटाची भुरळ पडली असून त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.
अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह 'भिरकीट' हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांना भावला असून त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा असं म्हटलं आहे. तसंच साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे खेळ काही दिवस अजून ठेवावेत, असं आवाहनही यावेळी केले आहे.
'' माझ्या काही परिचयाच्या लोकांनी 'भिरकीट' हा सिनेमा पाहिला आणि त्यांच्याकडून आलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकून चित्रपट पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. नुकताच हा चित्रपट पाहिला असून खूपच सुंदर अशी या चित्रपटाची बांधणी केली आहे. 'भिरकीट'मधील प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आसपास वावरत असते, हे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. काळासोबत पुढे जाताना माणूस माणुसकी मागे सोडत आहे, हेच खूप उत्तमरित्या यात मांडले आहे. माणुसकी जपण्यासाठी, नाते जपण्यासाठी, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असं उदयनराजे भोसले म्हणाले.