सध्या 'संघर्षयोद्धा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मराठा आरक्षण चळवळीचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याची कहाणी बघायला मिळणार आहे. या सिनेमातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ते म्हणजे छत्रपती शिवरायांची आरती. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता 'जय देव शिवराया' या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं संघर्षयोद्धा चित्रपटात पहायला मिळणार आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्षयोद्धा या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे. या चित्रपटाचा टीजर, ट्रेलरसह 'उधळीन जीव', 'मर्दमावळा शिवरायांचा वाघ' या गाण्यांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. आता चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती या चित्रपटात गायली गेली आहे. उत्तम शब्द, ताल धरायला लावणारं संगीत आणि आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २६ एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.