पाऊस रंगवतो... पाऊस नासवतो... पाऊस जगवतो.. पाऊस रागावतो... पाऊस रडवतो... पाऊस हसवतो... कधीही कुठेही कसाही असला तरी पाऊस गरजेचा असतो. उद्या महाराष्ट्रभरातील सिनेमागृहात पाऊस येतोय आणि प्रेक्षक या पावसात भिजायला आतूर आहेत. आम्ही बोलतोय ते उद्या 17 जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘येरे येरे पावसा’ (YeRe YeRe Pavsa ) या चित्रपटाबद्दल.
एका छोट्याशा खेडेगावातल्या चिमुकल्यांना पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा-निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी जुबैदाची भूमिका साकारली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातील जुबैदा साकारणाऱ्या छाया कदम या भूमिकेबद्दल भरभरून बोलल्या.
काही सिनेमे जगण्याचं बळ देतात...आपल्या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मी खरंच कधीही काहीही ठरवून करत नाही. येरे येरे पावसा’ हा सिनेमा माझ्याकडे आला, तेव्हा मला या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली होती. काही चित्रपट जगण्याचं, लढण्याचं प्रचंड बळ देतात. हा चित्रपट असाच आहे. लहान मुलांच्या माध्यमातून एक छोटी पण आशयानं मोठी असलेली एक कथा अतिशय रंजकपणे या चित्रपटात दाखवली गेली आहे.
झुंड, कौन प्रवीण तांबे, गंगूबाई काठियावाडी, सिंघम रिटर्न्स, सायेरिक अशा अनेक हिंदी मराठी सिनेमांमध्ये छाया कदम यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. भूमिका कुठलीही असो त्या प्रत्येक भूमिकेत अगदी फिट्ट बसतात. जुबैदाची भूमिकाही त्याला अपवाद नाही.
‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत मिलिंद शिंदे, संदेश जाधव, विनायक पोतदार, आर्या आढाव, चिन्मयी साळवी, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.