Pawankhind Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्यास सांगणारा ‘पावनखिंड’ (Pawankhin) हा ऐतिहासिक मराठी चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेल्या अभूतपूर्व लढा दाखवणारा हा सिनेमा येत्या 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठीतील आघाडीतील कलाकारांचा भलामोठा फौजफाटा, अंगावर शहारे आणणारा थरार असा सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त आहे. ट्रेलर पाहताना अंगावर काटा येतो.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती दिली. एका लढाईच्या दृश्याने ट्रेलरची सुरूवात होते. ही दृश्य अंगावर काटा आणतात. पाठोपाठ चिन्मय मांडलेकरांच्या रूपात शिवरायांची झलक दिसते. ट्रेलरमधील संवाद मनाला भिडतात. बाजीप्रभूंनी दिलेल्या अतुलनीय लढ्याचे दर्शनही हा ट्रेलर घडवतो.
प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यामुळे या खिंडीला पुढं पावनखिंढ हे नाव पडलं. पावनखिंडींचा हाच रणसंग्राम या चित्रपटात दाखवला जाणार आहे.तूर्तास चित्रपटाचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.