फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा येत्या 22 एप्रिलला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथं पुष्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानच्या वधाचा शिवप्रेमींना अभिमान वाटावा असा प्रसंग या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
काही तासांआधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो. जीजाऊंच्या संवादाने ट्रेलरची सुरूवात होते आणि पाठोपाठ अफजल खान पडद्यावर एन्ट्री होते. अफजलखानाने केलेले अत्याचार, त्याची ताकद या ट्रेलरमधून पाहायला मिळते. ‘अफजल खान की दहशत ही अफजल खान की ताकत है...,’ असा त्याचा तोंडचा संवाद ऐकायला मिळतो आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची महागर्जना ऐकायला मिळते.
‘आपल्या प्राणापेक्षा प्रिय भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन गाडायचा...,’ अशी महागर्जना ते करतात. शिवाजी महाराजांनी केलेली युक्ती आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्वाची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. हा ट्रेलर पाहतांना अंगावर काटा येतो. काही मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना क्षणोक्षणी नि:शब्द व्हायला होतं.
या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर ( Chinmay Mandlekar ) छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफजल खानाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर हे शिवराज अष्टक फिल्म सीरिज घेऊन येत आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांची आठ सिनेमांची मालिका आहे. या अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे चित्रपट आले. आता या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याआधी आलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता.