‘शुभलग्न सावधान’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीला एक नवा चॉकलेट बॉय मिळणार आहे. 12 ऑक्टोबरला रिलीज होणा-या या सिनेमाव्दारे अभिनेता प्रतिक देशमुख चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे.
मुळचा पुण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. प्रतिक सांगतो, “माझ्या घरात शिक्षणावर खूप भर आहे. त्यामुळे अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून मी वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी करत होतो. पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड मला परत मातृभूमीत घेऊन आले आणि मी शेवटी माझ्या आवडत्या क्षेत्रात आता प्रवेश करत आहे.”
प्रतिकने याअगोदर अनुपम खेर यांच्या एक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. सर्वसाधारणपणे बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करणे पसंत केले.
प्रतिक सांगतो, “मराठी सिनेमा हा अधिक आशयगर्भ आहे. आणि अभिनयाची चांगली जाण असलेले उत्तमोत्त्तम कलाकार इथे आहेत. त्यामूळे अभिनयाचा पाया मजबूत करायचा असेल. तर अशा कलाकारांसोबत काम करणे गरजेचे आहे. ह्या सिनेमामूळे मी सुबोध भावे, गिरीश ओक, निर्मिती सावंत, अशा अभिनयसंपन्न कलाकारांसोबत काम करू शकलो, ह्याचा मला आनंद आहे.” दुबईत आणि इगतपुरीत चित्रिकरण झालेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सहनिर्मात्याची धुरा बजावली आहे. ट्रेलर पाहताना 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.