Join us

‘मंकी बात’च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 6:49 AM

निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार...’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ...

निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार...’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार...’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते.  ‘मंकी बात’ च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी नंतर एक बालचित्रपट येत आहे.ही गोष्ट हसणारी.. रूसणारी ...!  ही गोष्ट खोडीची... नात्यातल्या गोडीची !!  ही गोष्ट आहे माणसातल्या माकडाची... आणि माकडातल्या माणसाची! ही गोष्ट आहे घरातल्या बिलंदर माकडांना घेऊन सहकुटुंब बघण्याची!‘हाहाकार...’ या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतो आहे. गाण्यातील ओळी प्रमाणेच ‘माणसा मधील माकड करते भूभूत्कार’ असे माकड चाळे करताना तो आपल्याला वारंवार दिसतो आहे. शाळेतले गुरुजी, विद्यार्थी आणि सोसायटीतील म्हाताऱ्या व्यक्ती देखील त्याच्या खोडयांपासून वाचलेले नाहीत, असे या गाण्यात दिसते. ‘हाहाकार...’ हे गाणे शुभंकर कुलकर्णी याने गायले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. त्यांची ही कलाकृती लहानग्यांना खास उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली मेजवानी ठरणार आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे तसेच चित्रपटाला संदीप खरे यांची गीते व संवाद आणि डॉ. सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभले आहे.चित्रपटात बाल कलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच एक प्रसिद्ध कलाकार वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सरप्राईज देण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांनी लिहिली आहे. धम्माल विनोदी असणारा ‘मंकी बात’ हा बालचित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील बच्चेकंपनीला भेटायला येणार आहे.