Join us

गोटया खेळाचा रंजक कॅलिडोस्कोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 4:08 PM

सुट्टीतलाच एक खेळ म्हणजे गोट्या. गोट्या हा खेळ फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार महाग नाही. पण हा खेळ अतिशय भन्नाट आहे.

ठळक मुद्दे ‘गोटया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे

मैदानावर धुळीने माखलेल्या शरीराने विविध खेळ खेळण्याचा आनंदच काही और. लगोऱ्या, रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, विटी-दांडू, भोवरा, आट्यापाट्या असे अनेक खेळ पूर्वी आवर्जून खेळले जायचे. साहित्याची फारशी गरज नसलेले मातीतले हे खेळ कालौघात दिसेनासे झाले. ‘गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी’ अशीच काहीशी स्थिती या खेळांबाबत झाली आहे. दुर्लक्षित अशा या प्रत्येक खेळाचे शारीरिक आणि मानसिक फायदे खूप आहेत. मातीतला आणि कुठलीही कुशलता नसलेला ‘गोटया’ हा त्यातलाच एक लोकप्रिय खेळ. हा खेळ चित्रपटाद्वारे नव्या पिढीला समजावा या दृष्टीने  दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे व निर्माते जय केतनभाई सोमैया यांनी ‘गोटया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. येत्या ६ जुलैला ‘गोटया’ चा हा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे.

सुट्टीतलाच एक खेळ म्हणजे गोट्या. गोट्या हा खेळ फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार महाग नाही. पण हा खेळ अतिशय भन्नाट आहे. मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत नेम लावायचे. नेम लागल्यानंतरचा आनंद काही औरच ! मात्र जनजागृती, प्रसार व प्रोत्साहन नसल्याने आजची पिढी या खेळाला मुकली आहे. अद्यापही या मैदानी खेळाबाबत निराशाजनक स्थिती आहे. मैदानी खेळाअभावी विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आजची पिढी संगणक आणि मोबाईल गेममध्ये गुरफटली आहे. याव्यतिरिक्त मैदानी खेळांसाठी विशेष नियोजन न झाल्याने आदी खेळांना साहित्य, मैदान व प्रशिक्षक यांचा कायमच अभाव राहिला आहे.

‘गोटया’ या चित्रपटाद्वारे ही स्थिती बदलता येऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न करत ‘गोटया’ खेळाचा सुरेख कॅलिडोस्कोप या चित्रपटात मांडण्यात आला आहे. मनामध्ये जिद्द निर्माण होण्यासाठी मैदानी खेळ नेहमीच उपयोगी पडतात. हे सांगू पाहणाऱ्या ‘गोटया’ या चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा अहिरे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.  ६ जुलैला ‘गोटया’ प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :मराठी