Join us

‘चित्रपटसृष्टीनं मला माणूस म्हणून घडवलं’ - अतिषा नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 1:03 PM

अबोली कुलकर्णी समाजातील हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक आगामी ‘बंदूक्या’ या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. अस्सल गावरान शिव्या, विशिष्ट बोली ...

अबोली कुलकर्णी समाजातील हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक आगामी ‘बंदूक्या’ या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. अस्सल गावरान शिव्या, विशिष्ट बोली भाषेचा वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. ‘बंदूक्या’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केले आहे. ‘बंदूक्या’ हा  वेगळ्या धाटणीचा तसेच मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटीबाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटात अभिनेत्री अतिषा नाईक ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्याशी या चित्रपटाच्या निमित्ताने मारलेल्या या मनमोकळया गप्पा...* ‘बंदूक्या’ चित्रपटातील तूमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?या चित्रपटाची कथा ही पारधी जमातीवर आधारित आहे. या जमातीतील लोक चोरी, मारी करत असतात, हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र, या समाजातील एखाद्या व्यक्तीने ठरवले तर या सर्व चुकीच्या रूढी-परंपरांना बगल देऊन एक नवी सुरूवात नक्कीच करू शकतो. याशिवाय यात एक सुंदर लव्हस्टोरी आहे. नक्कीच प्रेक्षकांना ती पाहायला खुप मजा येईल, यात काही शंका नाही. या चित्रपटात नायकाच्या आईची भूमिका मी साकारली आहे. तिचे तिच्या मुलावर जीवापाड प्रेम असते. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होऊ शकते. * ‘बंदूक्या’ हा चित्रपट त्याचे शीर्षक आणि गावरान भाषेमुळे चर्चेत आहे. याविषयी काय सांगाल?खरंतर, भाषाप्रमाण असं काहीही नसतं. जी भाषा ज्याला जशी येते तशी ती बोलली जाते. या लोकांच्या टापूतली ही भाषा आहे. हा गावरान भाषेचा लहेजा ऐकणाऱ्याला थोडासा वेगळा वाटतो, यासाठी की आपण अशी भाषा कधीही बोलत नाही. आणि अर्थातच जे वेगळं आहे, हटके आहे त्याची चर्चा ही होतेच नाही का?* तुम्ही प्रेमळ आई आणि कजाग सासूबाई तसेच निगेटिव्ह भूमिकाही साकारल्या आहेत. यापैकी कशा प्रकारच्या भूमिका करायला तुम्हाला जास्त आवडतं?कुठलीही भूमिका. कारण मी एक कलाकार आहे. जी भूमिका मला मिळाली ती मी एक आव्हान म्हणून स्विकारली पाहिजे. आत्तापर्यंत इतक्या भूमिका केल्या पण, असं कधीही वाटलं नाही की, मी ही भूमिका कशाला केली? खरंतर कोणतीही भूमिका पेलण्याइतकं सक्षम कलाकाराने स्वत:ला बनवायला हवं. रसिकप्रेक्षकांना अभिनय आवडायला हवा, ती व्यक्तीरेखा जवळची वाटायला हवी, एवढाच माझा प्रयत्न असतो.* मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक हे वेगवेगळ्या थीम, कथानक, विषय सध्या हाताळताना दिसत आहेत. काय वाटतंय या नव्या बदलांविषयी? मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे दिग्दर्शक चित्रपटांच्या माध्यमातून काही नवे बदल घडवू इच्छित असतील तर नक्कीच ही स्वागतार्ह गोष्ट आहे. चित्रपट म्हणजे समाजमनाचे प्रतिबिंब असते. रसिकांना जे रूचेल पचेल तेच प्रेक्षक आवडीने पाहत असतात. त्यामुळे समाजातील काही प्रश्न जर तुम्हाला लोकांसमोर यावेत असे वाटत असेल तर चित्रपटांच्या माध्यमातून नक्कीच आणले जावेत. तरूण पिढीलाही या गोष्टींची जाणीव व्हायला हवी.* अभिनेत्री म्हणून वाटचाल करत असताना या चित्रपटसृष्टीनं किती आणि काय काय शिकवलं?मला या मराठी चित्रपटसृष्टीनं माणूस म्हणूनच घडवलं. आपण काम करत असताना रोज नवे लोक आपल्याला भेटतात. अनेकांकडून आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतात. काही कलाकार खरंच उत्तम अभिनय साकारतात. त्यांच्याप्रमाणेच उत्कृष्ट अभिनय साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यांच्याप्रमाणेच सक्षम व्हावंसं मला वाटतं. ही जडणघडणीची प्रक्रिया आयुष्यभर सुरूच राहते. भूमिकांच्या माध्यमातून नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा माझा मानस असतो.