आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वासह प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). नाटक, मालिका, सिनेमा आणि आता तर वेबसीरिज अशा सगळ्यात क्षेत्रात प्रियाचा मुक्तपणे वावर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रियाचा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळतं. सहाजिकच जसजसा प्रियाचा चाहतावर्ग वाढत आहे तसतस तिचे चाहते तिच्याविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सध्या तिच्या बालपणीचा एक किस्सा चर्चिला जात आहे. प्रिया लहान असताना एकदा तिच्या आईने तिला चक्क घराबाहेर ठेवलं होतं.
अलिकडेच प्रियाने 'कर्ली टेल्स'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या बालपणापासून ते फिल्मी करिअरपर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला. प्रिया दादरमध्ये लहानाची मोठी झाली. त्यामुळे दादर आणि आजुबाजूच्या परिसराशी निगडीत तिच्या अनेक आठवणी आहेत. यापैकी तिने तिच्या चाळीतली एक आठवण शेअर केली.
"एकदा आम्ही आमच्या चाळीच्या चौकात खेळत होतो. त्याकाळी प्रत्येकाच्या घरी एक नियम होता की संध्याकाळी ७.३० झाले की सगळ्यांना आपआपल्या घरी जायचं. आणि, मग हातपाय धुणं, देवापुढे प्रार्थना म्हणणं आणि त्यानंतर ८ वाजता जेवणं करणं हे ठरलेलं असायचं.पण, एकदा काय झालं आम्ही बँटमिंटन खेळत होतो.आणि, आमची आई आम्हाला बोलवायला आली की घरी चला.पण, आम्ही आपलं पाच मिनिटं-पाच मिनिटं करत राहिलो. या पाच मिनिटांच्या नादात आम्हाला घरी जायला ८ वाजले", असं प्रिया म्हणाली.
पुढे ती सांगते, "घरी जायला उशीर झाल्याचं माझ्या आणि माझ्या बहिणीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे आता काही खैर नाही याची कल्पना आली होती. आम्ही गपगुमान घरी गेलो. तर माझ्या आईने आम्हाला घराबाहेर उभं केलं आणि दार लावून घेतलं. वरुन आई आम्हाला सांगते, मी तुम्हाला म्हणाले होते ७.३० झाले घरी चला. तुम्ही ऐकलं नाही ना मग आता बाहेर उभं राहा आणि पाहा कोण जेवायला देतंय का? त्यानंतर आम्ही अगदी रडकुंडीला आलो मग आईने आम्हाला घरात घेतलं."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये प्रियाने तिच्या चाळीतल्या अनेक आठवणी सांगितलं. तसंच तिच्या फिल्मी करिअरमधील तिच्या प्रवासाविषयीदेखील भाष्य केलं. कलाविश्वात तिचं पदार्पण कसं झालं, 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' मधील तिच्या भुमिकेविषयीदेखील तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.