- प्रार्थना बेहेरे (अभिनेत्री)
पेंटिंग हे माझे पहिले प्रेम आहे. हे प्रेम मी रांगोळी, मेहंदी, चित्रकलेद्वारे व्यक्त करते. ‘वी नारी’ हा साड्यांचा ब्रँड मी सुरू केला आहे. त्यात मी निरनिराळे रंग वापरून साड्या बनवते. यामुळे वेगळाच आनंद मिळतो. मी आई आणि सासूबाईंना सांगितले की, कॅमेरा फेस केल्यावर मला जेवढा आनंद मिळतो तितकाच ‘वी नारी’ ब्रँडसाठी डिझाइन्स तयार करताना, साड्या बनवताना, विविध रंगांच्या पॅटर्न ट्राय करताना, महिलांना भेटताना, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना होतो. यातून मिळणारा आनंद खूप वेगळा आहे.
शाळेत असताना मी एलिमेंट्रीच्या तीनही परीक्षा दिल्या होत्या. दहावीत चांगले टक्के मिळाल्याने बाबांनी सायन्स घ्यायला सांगितले. तिथे इतका अभ्यास होता की चित्रकलेसह इतर गोष्टींसाठी वेळ मिळाला नाही. बारावीत चांगले टक्के आल्यावर मी फाइन आर्ट्स करते असं बाबांना सांगितले. मुंबईला येऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पण बाबांचे म्हणणे होते की तुला बीएस्सी मॅथेमॅटिक्सला ॲडमिशन मिळतंय मग का करत नाहीस? अगोदर शिक्षण, मग कला...आमच्या कुटुंबात सर्वांनीच शिक्षणाला महत्त्व दिल्याने मी कला थोडी बाजूला ठेवली.
कोरोनाच्या काळात आयुष्यात रंगांनी सकारात्मकता आणली आणि पेंटिंग्ज सुरू केली. आताही करतेय आणि पुढेही करत राहीन. मला ॲबस्ट्रॅक्ट चित्रे काढायला आवडतात. मला निसर्ग आकर्षित करत असल्याने त्यातील घटक कागदावर उतरावायला आवडते. साड्यांबाबत सांगायचे तर मी बाजारातून कोरे कापड आणते. त्यावर माझ्या संकल्पनेतून रंगीबेरंगी डिझाइन्स तयार करते.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर मला जाणवले की, माझ्या फॅन्सना मला कंटेम्प्ररी साड्यांमध्ये पाहायला आवडते. मालिकेतील साड्याही मी स्वत:च डिझाइन केल्या होत्या. एकही साडी तयार आणलेली नव्हती. मी कापड घेऊन त्याच्या साडी बनविल्या होत्या. यात माझ्या स्टायलिस्टचीही मदत झाली, जी आज माझी मॅनेजरच बनली आहे.