Join us

दिलीप प्रभावळकर या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 3:17 PM

 बेनझीर जमादार                      श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत ज्येष्ठ ...

 बेनझीर जमादार                      श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले 'आबा' हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही मालिका संपल्यानंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा छोटया पडदयावर पाहायला मिळाले नाहीत. मात्र, आता ते बारा-तेरा वर्षानंतर छोटया पडदयावर परतत आहेत. ते 'चुकभूल द्यावी घ्यावी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विशेष म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या नाटकावरच आधारित ही नवीन मालिका असणार आहे. या मालिकेच्या अनुषंगाने त्यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद.  तुम्ही बारा ते तेरा वर्षानंतर छोटया पडद्यावर दिसणार आहात त्याविषयी काय सांगाल?खरं सांगू का, मालिकांमुळे साचेबध्द प्रक्रियेमध्ये अडकण्याची भीती असते. तसेच मालिकांच्या रुटीनचा कंटाळा हा देखील त्याचा एक भाग असतो. म्हणून छोटया पडद्यावर येण्यास मी टाळाटाळ करत होतो. तसेच कमी वेळात जास्त काम करण्याचा माझा प्रयत्न होता. तसेच नाटक, लिखाण, चित्रपट व परदेश दौरे असल्यामुळे छोट्या पडद्यावर येण्यास तेवढा वेळदेखील मिळत नव्हता. छोटया पडद्याने मला इमेज, चेहरा, लोकप्रियता, ओळख दिली आहे. त्याचबरोबर कृष्णधवल टीव्हीवर चिमणराव ही आमची पहिली मालिका छोटया पडद्यावर दाखविण्यात आली. त्यामुळे नेहमीच छोटा पडदा हा माझ्यासाठी अगदी जवळचा राहिला आहे. तुमच्या नाटकावर आधारित ही मालिका असणार आहे त्यामुळे काय वाटते?खरं तर हे नाटक मी रंगभूमीसाठी लिहिले आहे. मात्र आता हे नाटक टीव्हीवर दिसणार आहे. त्यामुळे त्याचे माध्यम बदलणार आहे. त्यामुळे छोटया पडद्याची गरज पाहता, त्यातील पात्र, कथा, प्रसंगात बदल करावे लागणार आहे. तसेच सव्वा तासाचे नाटक आणि मालिकेचे इतके एपिसोड असल्यामुळे अवाका मोठा आहे. त्यामुळे मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना ती बदल करण्याची परवानगीदेखील दिली आहे. तसेच मीदेखील या मालिकेत असल्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. तुम्हाला पूर्वीपेक्षा आता, मराठी चित्रपटसृष्टीत काय बदल जाणवतो?मला असं वाटते की, चित्रपटामध्ये विषय,आशय, व्यक्तीरेखा यामध्ये खूपच विविधता पाहायला मिळतात. आता नवीन विषय, कल्पना, उमेद आणि ऊर्जा असणारे नवीन दिग्दर्शक चित्रपटसृष्टीमध्ये आले आहेत. अलीकडे मी देखील गणवेश, पोस्टर बॉईज, जयजयकार या चित्रपटात काम केले आहे. हे सर्व चित्रपट दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट होते. तसेच माझ्या काही आगामी चित्रपटातदेखील मी नवीन दिग्दर्शकांसोबत काम करत आहे. नवीन दिग्दर्शकांसोबत काम करताना तुम्हाला काय वेगळेपण जाणवते?नवीन मुलांसोबत काम केल्यामुळे त्यांच्या नवीन कल्पना, कामाची नवीन पद्धत पाहायला मिळते. काही दिग्दर्शक नव्याने शिकतात. तर काही काम करत असताना शिकत असतात. त्यांना नवीन तंत्राची अधिक माहितीदेखील असते. त्यांच्यासोबत काम करताना भीती वाटण्यापेक्षा अधिका मजा येते.या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना काय सांगू इच्छिता?आजची मुले खूपच हुशार आहेत. त्यांची मेहनत घेण्याची तयारी असते. तसेच त्यांना चित्रपट, मालिका, इव्हेंट असे खूप सारे पर्या़य उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी कित्येक संधी उपलब्ध असतात. म्हणून त्यांनी एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच सध्या दिग्दर्शकासोबत खूप नवीन मुले पाहायला मिळतात. यावेळी त्यांचा जो आत्मविश्वास असतो. तो खरंच पाहण्यासारखा असतो. सध्या सोशल मीडियावर कलाकारांविषयी वाईट बातमी असणाऱ्या अफवांविषयी काय सांगाल?सोशल मीडिया हे सदुपयोग व दुरूपयोग असणारे माध्यम आहे. नुकताच याचा अनुभव मलादेखील आला आहे. माझ्याविषयी अशी अफवा ऐकताच मी हैराण झालो होतो. तसेच माझ्या जवळच्या नातेवाईकांनादेखील खूपच त्रास झाला. मात्र अशा प्रकारच्या बातम्यांची लोकांनी पहिल्यांदा शहनिशा करावी असे मला वाटते. सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजची प्रथम खात्री करूनच मगच तो फॉरवर्ड करावा.