Join us

असामान्य नेत्रांची सामान्य कथा 'असेही एकदा व्हावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 4:18 AM

झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात उमेशने साकारलेली अंध व्यक्तीची भूमिका, प्रेक्षकांना नात्याची ...

झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात उमेशने साकारलेली अंध व्यक्तीची भूमिका, प्रेक्षकांना नात्याची डोळस कथा सांगण्यास यशस्वी ठरत आहे. मधुकर रहाणे आणि रवींद्र शिंगणे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात उमेशसोबत तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात उमेशने 'सिद्धार्थ वैद्य' या अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. आपल्या बोलक्या डोळ्यात भाव न आणता अभिनय करण्याचे आव्हान या चित्रपटात उमेशला होते. त्यासाठी त्याला पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांची मोलाची साथ लाभली. चिंतामणी हसबनीस यांच्या परीसस्पर्शामुळे 'असेही एकदा व्हावे' सिनेमाचे सोने झाले असल्याचे, दिग्दर्शक सुश्रुत भागवत सांगतात. 'गुगलवर अंधासाठी भरवल्या जाणा-या प्रदर्शनाची माहिती शोधत असताना, चिंतामणी हसबनीस यांचे नाव समोर आले. अंध व्यक्तींसाठी त्यांनी खास चित्र तयार केली असून त्यांवर ब्रेल लिपीमध्ये त्या चित्राची पूर्ण माहिती उतरवली आहे. अंधांसाठी पूर्ण भारतभर त्यांचे प्रदर्शन असते. माझ्या मित्राकडून मला त्यांचा नंबर मिळाला, त्यांनी उमेशला चांगले ट्रेन केले. अनेक छोट्या-मोठ्या दुर्लक्षित होत असलेल्या गोष्टी त्यांसकडून समझल्या. अंध व्यक्तीच्या डोळ्यांच्या हालचालीवर सूक्ष्म नरीक्षण त्यांनी केले, आणि  त्यामुळेच उमेशने साकारलेलं हे पात्र जिवंत होऊ शकले' असे सुश्रुत सांगतात.  उमेशने साकारलेली हि भूमिका अर्थातच खूप आव्हानात्मक होती. कारण, त्याचे हे अंधत्व चित्रपटाच्या मध्यंतराला प्रेक्षकांना समजत असल्यामुळे या धक्कातंत्राचा वापर यशस्वी झाला आहे. शिवाय अंध व्यक्तीला घेऊन जेव्हा आपण वावरतो तेव्हा, त्याला धरलेलं किंवा आधार दिलेला आवडत नाही. त्याचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. यांसारख्या छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टींदेखील यात उत्तमरीत्या मांडल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थ या पात्राच्या आजूबाजूला वावरणाऱ्या पात्रांचा वावरदेखील अगदी तसाच असल्याकारणामुळे, हा सिनेमा दर्जेदार अभिनयाने युक्त आहे.कवितेसारखी तरल कथा असणा-या या सिनेमाची कथा-पटकथा सुश्रुत आणि शर्वणी पिल्लई यांनी लिहिली असून, संजय मोने यांचा संवाद लाभला आहे. तेजश्री प्रधानने सकारेली आर.जे. क्युट किरणची व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांना आवडत असून, शर्वणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, कविता लाड, अजित भुरे आणि नारायण जाधव या कलाकारांचादेखील समावेश आहे. या सिनेमात अंध व्यक्तींचे एक गुपितदेखील दडले आहे. डोळ्यांच्या विशिष्ठ आकारमानामुळे अंध व्यक्ती समजून येतात. मात्र सिनेमात उमेशचे डोळे सामान्य दिसतात. याला एक वैद्यकीय कारण असून, या कारणांमुळे अनेक व्यक्ती अंध असूनदेखील कळून येत नाही. ते असे का? हे जर जाणून घ्यायचे असेल तर 'असेही एकदा व्हावे' हा सिनेमा प्रेक्षकांनी नक्कीच पाहावा.