Corona Virus च्या कचाट्यात सुबोध भावेही अडकला, घेतला हा मोठा निर्णय !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:16 AM2020-03-11T10:16:44+5:302020-03-11T10:17:21+5:30
गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना मिळाल्यामुळे नियोजित नाट्यसंमेलनही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना व्हायरसने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. जगात झपाट्याने पसरणा-या कोरोनाची दहशत दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः गर्दीचे ठिकाणांवर कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्यामुळे थिएटर, मॉल, मंदिरं अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. नुकतेच बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह अपेक्षित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीवरही याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मराठी नाट्यसृष्टीवरही कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. ''अश्रृंची झाली फुले'' या नाटकाचे अमेरिकेतील दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती सुबोध भावेने दिली आहे.
27 मार्च ते 26 एप्रिल या दरम्यान या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार होते. आता कोरोनाची दहशत पाहाता खबरदारी म्हणून या तारखा आता अपिक्षेत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत आता नाटकाचे परदेशातील दौरे होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
इतकेच नाहीतर सांगलीत होणा-या शंभराव्या नाट्यसंमेलनावर कोरोना इफेक्ट पाहायला मिळतोय. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना मिळाल्यामुळे नियोजित नाट्यसंमेलनही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना आटोक्यात आला तरच ठरलेल्या काळात हे नाट्यसंमेलन पार पडणार अशी चिन्ह सध्या आहेत.