मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे. नेहमी हसतमुख असणा-या अश्विनी भावे आज मात्र भावूक झाल्या आहेत. सध्या कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. भल्या भल्यांना कोरोनाने धडकी भरवली आहे.
अश्विनी भावे यांनी त्यांच्या मनात कोरोनाला घेऊन माजलेला काहूर पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसमोर मांडला आहे. कोरोना या महामारीमुळे अश्विनी खूप चिंतेत आहेत. तसेच अशा या भयावह वातावरणात आपल्या जीवाची परवाह न करता आपले डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस, सरकारी यंत्रणा दिवसरात्र एक करून आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र झगडत आहे. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. वेळीच सावध व्हा आणि कोरोनापासून बचाव करा त्यासाठी घरातच राहा. अजूनही काही लोक या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नसलेल्यांवर त्यांनी राग व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे न्यूयॉर्क सिटीत हाहाकार उडाला आहे. गेल्या २४ तासांत शहरात ८५ जणांचा मृत्यू झाला तर ४० हजारावर लोक बाधित आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरात २३ हजार ११२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. विषाणूची बाधा रोखण्यासाठी शहर प्रशासनाने लष्कराला पाचारण केले आहे. १०० हून जास्त अब्जाधीश असलेल्या शहरातील रुग्णालयांत गर्दी वाढू लागली आहे. शहरात उपचारासाठी रुग्णालये मिळेनाशी झाली आहेत. सर्व रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. त्यामुळे आता मोकळ्या जागेत उपचार करण्याची वेळ आली आहे.