गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या (mukta barve) 'वाय' (Y) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री भ्रुण हत्या यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं. विशेष म्हणजे अजित वाडीकर यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. यामध्येच एका प्रेक्षकाने चित्रपटामुळे प्रेरित होऊन चक्क थिएटरमध्येच आपल्या लेकीचा नामकरण सोहळा केला.
कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या चित्रपटामुळे प्रेरित होऊन आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीच्या नामकरण विधी करण्याचं ठरवलं. या जोडप्याने 'वाय'चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. या शोच्या दरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधीही घडवून आणला. सध्याच्या काळात अनेक जण मोठमोठ्या हॉलमध्ये बारसं करतात. परंतु, देशमाने जोडप्याने थिएटरमध्ये आपल्या लेकीचं बारसं करत उपस्थित पाहुण्यांना वाय चित्रपट दाखवला. या चित्रपटातून त्यांनी समाजाला मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
'' लग्नाच्या दहा वर्षांनंतर आम्हाला कन्यारत्न झाले आणि याचा आम्हाला आनंदच आहे. यापूर्वी मुलगाच हवा, वंशाचा दिवाच हवा, ही अशी वाक्ये मी स्वतः अनुभवली आहेत. 'वाय'च्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आम्ही 'मुक्ता'चं बारसं अशा पद्धतीने करण्याचे ठरवेल. मिष्टान्नांची मेजवानी तर असतेच मात्र ही आमची वैचारिक आणि समाज प्रबोधनात्मक मेजवानी आहे. हा चित्रपट पाहून मुलगी म्हणजे ओझे मानणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत थोडा जरी फरक पडला, तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आम्हाला आनंद होईल. असे चित्रपट बनायला हवेत आणि मुख्य म्हणजे असे चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला हवेत'', असं सई देशमाने म्हणाल्या.
दरम्यान, या जोडप्याने केवळ चित्रपटातून सामाजिक संदेशच दिला नाही. तर त्यांच्या लेकीचं नावही तितकंच खास ठेवलं. 'वाय' चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकली असून या अभिनेत्रीच्या नावावरुनच त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव 'मुक्ता' ठेवलं आहे.