‘कोर्ट’ हा सिनेमा आठवतोय ना? या सिनेमाने जगभरातले 18 पेक्षा अधिक पुरस्कार पटकावले होते. इतकेच नाही तर हा सिनेमा भारतातर्फे ऑस्करसाठीही पाठवला गेला होता. या सिनेमाचा दिग्दर्शक कोण तर चैतन्य ताम्हाणे. याच चैतन्यच्या आणखी एका सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे नाव आहे,‘The Disciple’. मराठमोठ्या चैतन्यचा हा सिनेमा 77 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रतिष्ठित गोल्डन लायन स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे.
‘The Disciple’ हा व्हेनिस आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेसाठी निवड झालेला एकमेव भारतीय सिनेमा आहे. एवढेच नाही तर व्हेनिस, कान्स आणि बर्लिन या तीन प्रमुख युरोपियन फिल्म महोत्सवातांपैकी एक असलेल्या व्हेनिसच्या मुख्य स्पर्धेत सहभागी झालेला सुमारे दोन दशकांतील पहिला सिनेमा आहे. यापूर्वी मीरा नायर दिग्दर्शित ‘मान्सून वेडिंग’ या सिनेमाने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार जिंकला होता. 77 वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह कोरोना महामारीनंतर ऑफलाइन आयोजित केला जाणारा पहिला सोहळा ठरला आहे. येत्या 2 ते 12 सप्टेंबर या महोत्सवाचे आयोजन होणार आहे.