मराठी चित्रपटसृष्टीतील परमसुंदरी म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) शेवटची इंडिया लॉकडाउन चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचे खूप कौतुक झाले. सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिने एका मित्राचे हजारो रुपये थकवल्याची कबुली दिली आहे.
सई ताम्हणकरच्या दुनियादारी चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या चित्रपटातील कलाकार झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या भागात भाऊ कदमने सईला एमबीए असे लिहिलेले एक पुस्तक भेट दिले. भाऊकडून मिळालेली ही भेट पाहून सईला हसू आवरले नाही. त्यानंतर तिने यामागची गोष्ट सांगितली.
सईने एमबीएसाठी घेतलं होतं ॲडमिशन
सई ताम्हणकर म्हणाली की, मी काही वर्षांपूर्वी एमबीएला प्रवेश घेतला होता. अभिनय क्षेत्रात काम करताना आपला काहीतरी बॅकअप प्लॅन असावा म्हणून मला एमबीए करायचे होते. माझ्या ज्या मित्राच्या वशिल्याने मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती, त्याचे १५ हजार रुपये मी अजूनही त्याला दिले नाहीत. त्याला मी ते कधीही देणार नाही. पुढे त्या एमबीएचे मी काहीही केले नाही. त्याची सगळी पुस्तके माझ्या घरात अजूनही तशीच पडून आहेत. सई ताम्हणकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.