उत्तम अभिनयासह विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे दिवंगत अभिनेते म्हणजे दादा कोंडके. मराठी सिनेसृष्टीमध्ये दादा कोंडके यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक कलाकारांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर, काही कलाकारांनी त्यांचे आभार मानले. यामध्येच अभिनेता किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी दादा कोंडके यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दादा कोंडके यांच्याविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर दादा कोंडके यांना त्यांच्या विनोदावरुन ट्रोल करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत.
नेमकं काय म्हणाले किरण माने?
"साला तुम लोगने वो तुकारामको उपर पाठव्या... तुमने साला वो मिराबाईको जहर पिलाया... संत ज्ञानेश्वरको तुम लोगोंने गाड दिया... तुम लोग सिर्फ डाकू लोगकोच पसंद करता हय." दादा कोंडकेंच्या 'राम राम गंगाराम' मधला म्हमद्या खाटिक बोलून जातो...असलं जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांमधनं सांगनार्या दादांना 'अश्लील' म्हणून का हिनवलं गेलं हे मला आजपर्यन्त कळलेलं नाय दोस्तांनो ! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हन्लं की ज्यांना फक्त 'डबल मिनिंग'चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच न्हाईत !...श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, जो मनोरंजन करता-करता समाजाच्या खर्या वेदनांना वाचा फोडतो... जनजागृतीची, समाजसुधारणेची जबाबदारी खांद्यावर घेतो. जातीधर्मापलीकडची 'मानवता' जपतो. त्या कलाकारालाच सर्वसामान्य प्रेक्षक मनापास्नं भरभरून प्रेम देतात... जसं दादांना दिलं !
दादांनी आपल्या पिच्चरमधनं बिनधास्तपने सामाजिक-राजकीय भाष्य केलं... त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय गांधींच्या धोरनांवर, आनीबानीमधल्या अराजकावर सडकून आन् बेधडक टीका केली. गायवासरू हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. त्याकाळात नोटा खाणारं वासरू आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी गाय हे दाखवणं लै खतरनाक होतं गड्याहो....'राम राम गंगाराम'मधला म्हमद्या खाटीक आनि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती.. त्यात हिंदू-मुस्लीम एकतेचा सामाजिक संदेशबी व्हता ! "मटनाच्या दुकानात भगवान शंकराच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या... ते पाहून 'भावना दुखावून' चिडनारे (मटन आनायला आलेले) गुरूजी... हे समदं लै लै लै खोल व्हतं भावांनो ! 'ह्योच नवरा पायजे' मधला "गॉड इज वन.. पन नेम्स आर अनेक." असं म्हनत फादरनं दिलेला क्रॉस आनंदानं गळ्यात घालनारे आनि त्याचवेळी चॉदभाईनं दिलेला ताईत दंडाला बांधनारे दादा ज्याला कळले.. तो दादांना कधीच 'फक्त' डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करनार नाय !
याच सिनेमातला एक प्रसंग तर लै लै लै खतरनाक हाय.. 'जॉन बेकरी' मध्ये गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक म्हातारा अडवतो आणि म्हणतो "काय रे शिंच्याS? हिंदू असुन गळ्यात क्रॉस घातलायस? एकादशीच्या मुहूर्तावर खिश्चन झालास की काSय?" त्यावर दादा त्याला सुनावतात, "तुम्ही काय केलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे.. हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा 'जॉन कॅंबल' केला..त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय..तुमाला लाज वाटत नाय??? यू बेशरम..तुला जोड्यानंच मारला पायजे," म्हनत खाडदिशी त्याच्या मुस्काडात देनारे दादा.. आनि घाबरून गळून जानारा तो म्हातारा... आनि त्यावर कळस म्हन्जे त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना "उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो." 'यातलं बिटवीन द लाईन्स' कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या... दादा ह्यो 'दादा' मानूस व्हता !
दादा, तुमच्यासारखा एकीकडे खळखळून हसवत, दूसरीकडं अतिशय अभ्यासपूर्वक, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून, उघडंनागडं 'सत्य' बोलनारा एकही कलावंत आज आमच्या अवतीभवती दिसत नाही... अभिनेत्याकडं समाजभानातनं आलेली निर्भिडता आणि विद्रोह या गोष्टी अंगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेच बहुसंख्य कलाकारांना माहिती नाही. 'तुमचं आमचं जमलं' सिनेमात तुम्ही तुमच्या वाघ्या नांवाच्या कुत्र्याला विचारता, "खोटं बोलूनी पोट भरतया म्हनून का रं जगायचं? माल कुनाचा कोन खातुया, किती दिस हे बघायचं??" ...असो. "गेली सांगून द्यानेसरी..मानसापरास मेंढरं बरी !" हेच खरं. मिस यु दादा. लब्यू लैच.